वृत्तसंस्था/ अयोध्या
भारतीय क्रिकेटपटू विराट कोहली याने रविवारी अयोध्येत पोहोचत पत्नी अनुष्का शर्मासह भगवान रामलल्ला आणि बजरंगबलीची पूजा केली. रविवारी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास विराट कोहली आणि अनुष्का शर्मा अयोध्येत पोहोचले होते. सुरुवातीला त्यांनी राम मंदिरात रामलल्लाचे दर्शन घेतले. दोघेही सुमारे 10 मिनिटे गर्भगृहात होते. मात्र, राम मंदिरातील विराट-अनुष्काचे फोटो समोर आलेले नाहीत. यानंतर, दोघेही कडक सुरक्षेत हनुमानगढीला पोहोचले. तेथे बजरंगबलीचरणी प्रार्थना केल्यानंतर कोहली हनुमानगढीशी संबंधित काही संतांनाही भेटले. अयोध्या दौऱ्यावेळी दोघांनीही प्रसारमाध्यमांपासून अंतर राखले. दुसरीकडे, चाहते आपल्या आवडत्या क्रिकेटपटूसोबत सेल्फी घेण्यास उत्सुक असल्याचे दिसून आले. परंतु सुरक्षेच्या कारणास्तव पोलिसांनी त्यांना रोखले.









