‘आप’ सरकारचा आणखी एक मोठा निर्णय
@ चंदीगड / वृत्तसंस्था
पंजाब पोलिसांनी सुमारे 184 माजी मंत्री आणि आमदारांची सुरक्षा काढून घेण्याचे आदेश जारी केले आहेत. या व्हीआयपींच्या सुरक्षेसाठी 300 हून अधिक जवान तैनात करण्यात आले होते. हे आदेश एडीजीपींनी सर्व पोलीस प्रमुखांना पाठवले आहेत. पंजाबचे माजी मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी यांच्या कुटुंबाच्या सुरक्षेत तैनात असलेले कर्मचाऱयांसह माजी आयपीएस अधिकाऱयांच्या सुरक्षेसाठी तैनात असलेल्या कर्मचाऱयांनाही माघारी बोलावण्यात आले आहे.
पंजाबमध्ये आम आदमी पार्टीचे सरकार स्थापन झाल्यानंतर दुसऱयांदा सुरक्षा कर्मचाऱयांच्या माघारीची यादी जारी करण्यात आली आहे. यावेळी ज्या लोकांची सुरक्षा काढून घेण्यात आली आहे त्यात डझनभर माजी मंत्री आणि माजी खासदारांचा समावेश आहे.
राज्य सरकारच्या आदेशानंतर आम आदमी पक्षाचे माजी राज्य संयोजक सुचासिंग छोटेपूर, माजी खासदार राजीव शुक्ला, माजी खासदार संतोष चौधरी, माजी खासदार वरिंदर सिंग बाजवा, माजी कॅबिनेट मंत्री सुरजितसिंग रखडा, जनमेजा सिंग सेखो, बीबी जागीर कौर, मदन मोहन मित्तल, गुलजार सिंग, माजी खासदार डॉ. सहान सिंग थंडल, तोतासिंग यांची सुरक्षा काढून घेण्यात आली आहे.
याशिवाय अनेक माजी सभापतींच्या सुरक्षेत तैनात असलेली सुरक्षाही काढून घेण्यात आली आहे. मार्च महिन्यातही व्हीआयपींच्या सुरक्षेसाठी कार्यरत असलेल्या 400 हून अधिक विविध बटालियन आणि कमांडो फोर्सचे जवान मागे घेण्यात आले होते. पंजाबच्या मागील सरकारमध्ये मंत्री असलेले अमरिंदर सिंग राजा वाडिंग आणि अर्थमंत्री मनप्रीत सिंग बादल यांच्या सुरक्षेतही मोठी कपात केली आहे.









