पोलिसांनी गस्त वाढविण्याची मागणी
बेळगाव : वडगाव परिसरात चोऱ्या,घरफोड्यांपाठोपाठ आता भुरट्या चोऱ्या वाढल्या असतानाच काही संशयितांची छबी परिसरातील सीसीटीव्हीत कैद झाली आहे. त्यामुळे वडगाव परिसरात खळबळ माजली आहे. संभाजीनगर-गणेश कॉलनी, यरमाळ रोड परिसरात नव्या बांधकामावरील लोखंड व इतर वस्तू पळविण्याचे प्रकार वाढले आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. एक वर्षापूर्वी वडगाव, अनगोळ परिसरात धुमाकूळ घालणाऱ्या सोलापूरच्या गुन्हेगाराचा अद्याप तपास लागलेला नाही. सध्या वडगाव परिसरात भुरट्या चोऱ्या वाढल्या आहेत. त्यामुळे पोलिसांनी गस्त वाढविण्याची मागणी केली जात आहे. मध्यरात्रीनंतर संशयितांचा वावर वडगाव परिसरात वाढतो. त्यांच्या मुसक्या आवळून परिसराला भयमुक्त करण्याची मागणी करण्यात येत आहे.









