राजधानी बेलग्रेडच्या रस्त्यांवर उतरले लोक
वृत्तसंस्था/ बेलग्रेड
युरोपीय देश सर्बियामध्ये हजारोंच्या संख्येत लोक रस्त्यांवर उतरले असून त्यांनी लिथियमच्या खाणींच्या विरोधात निदर्शने सुरू केली आहेत. वादग्रस्त राहिलेली लिथियमची खाण पुन्हा सुरू करण्याच्या निर्णयाच्या विरोधात लोकांनी राजधानी बेलग्रेडमध्ये निदर्शने केली.
तर निदर्शनांपूर्वी पोलिसांनी दोन प्रमुख निदर्शक नेत्यांना काही काळासाठी ताब्यात घेतले होते. निदर्शनांदरम्यान कुठल्याही प्रकारची वाहतूक रोखण्याच्या कृतीला अवैध मानले जाणार असल्याचा इशारा पोलिसांकडून देण्यात आला होता. तर सर्बियाच्या अधिकाऱ्यांनी देखील निदर्शनांमध्ये सामील लोकांना इशारा दिला होता.
निदर्शकांनी ‘रियो टिंटोने सर्बियातून बाहेर पडावे’ आणि ‘तुम्ही खननकार्य करू शकणार नाही’ अशा घोषणा देत बेलग्रेडमध्ये रॅली काढली. निदर्शक हे बेलग्रेडच्या मुख्य रेल्वेस्थानकात शिरल आणि त्यांनी रेल्वेमार्गावर ठाण मांडून रेल्वेवाहतूक रोखली आहे.
सर्बियाचे शहर लोज्निकानजीक लिथियमचे मोठे साठे आहेत. येथे अँग्लो-ऑस्ट्रेलियन खाण कंपनी रियो टिंटो या लिथियम खाण प्रकल्पाला विकसित करत आहे. परंतु सर्बियात हा प्रकल्प लोकांच्या विरोधाला तोंड देत आहे. ही खाण देशच्या पाण्याच्या स्रोतांना प्रदूषित करत सार्वजनिक आरोग्य धोक्यात आणेल अशी भीती सर्बियाच्या लोकांना सतावत आहे.
2004 मध्ये साठ्यांचा लागलाव शोध
लिथियमच्या या साठ्यांचा शोध 2004 साली लागला होता. परंतु अनेक आठवड्यांपर्यंत चाललेल्या निदर्शनांमुळे सरकारला 2022 मध्ये हा प्रकल्प रोखावा लागला होता. मागील महिन्यात न्यायालयाच्या निर्णयानंतर सर्बियाच्या सरकारने हा प्रकल्प पुन्हा सुरू केला होता. लिथियम हा रणनीकि स्वरुपात मूल्यवान धातू ओ. इलेक्ट्रिक वाहनांच्या बॅटरीसाठी लिथियम महत्त्वाचा घटक आहे.









