दोन्ही गटातील 6 जण जखमी : पोलिसांत परस्परविरोधी फिर्यादी : अर्वाच्य शब्दात शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकीही
बेळगाव : जमीन आणि पैशाच्या वादातून कोंडुसकोप्प (ता. बेळगाव) येथे भावकीतील दोन गटात रविवार दि. 19 रोजी सकाळी 11 च्या दरम्यान तुंबळ हाणामारीची घटना घडली आहे. विळा, लाठ्याकाठ्या, विटा व लाथाबुक्क्यांनी एकमेकांना मारहाण करण्यात आल्याने दोन्ही गटातील 6 जण जखमी झाले. या घटनेमुळे गावात काहीवेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू असून, या प्रकरणी हिरेबागेवाडी पोलीस स्थानकात दोन परस्पर विरोधी फिर्यादी दाखल झाल्या आहेत.
अंकुश अशोक पाटील रा. कोंडुसकोप्प यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी अर्जुन ओमाण्णा पाटील, कृष्णा अर्जुन पाटील, यल्लाप्पा अर्जुन पाटील, रमेश गजानन पाटील, मंजुनाथ श्रीनाथ सनदी, गोपाळ ओमाण्णा पाटील, रेणुका अर्जुन पाटील यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. तर अशोक ओमाण्णा पाटील, अंकुश अशोक पाटील, मंगाण्णा अशोक पाटील, आकाश अशोक पाटील हे जखमी झाले आहेत.
अर्जुन ओमाण्णा पाटील रा. कोंडुसकोप्प यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी अशोक ओमाण्णा पाटील, अंकुश अशोक पाटील, आकाश अशोक पाटील, मंगाण्णा अशोक पाटील, मारुती मंगाण्णा पाटील, मंगाण्णा मल्लाप्पा पाटील, गंगाराम रामचंद्र पाटील सर्वजण राहणार कोंडुसकोप्प यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. अर्जुन ओमाण्णा पाटील (वय 71), रेणुका अर्जुन पाटील (52) दोघेही रा. मंगाई गल्ली कोंडुसकोप्प हे जखमी झाले आहेत.
गावात काहीकाळ तणावाचे वातावरण
अर्जुन ओमाण्णा पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, या प्रकरणातील आरोपी व आपण नातेवाईक आहोत. दोघांमध्ये जमीन आणि पैशाच्या व्यवहारावरून वैमनस्य आहे. याच कारणातून रविवार दि. 19 रोजी सकाळी 11 च्या दरम्यान आरोपींनी बेकायदेशीररित्या घरात प्रवेश करत खून करण्याच्या उद्देशाने आपल्याला दगड, हाताने, तसेच विळ्याने हल्ला करून जखमी केले. भांडण सोडविण्यासाठी आलेल्या माझ्या पत्नीवरही विळ्याने हल्ला करून गंभीर जखमी केले आहे. इतकेच नव्हे तर अर्वाच्य शब्दात शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिल्याचे त्यांनी म्हटले आहे. सकाळी 11 च्या दरम्यान भावकीतील दोन गटात झालेल्या या तुंबळ हाणमारीच्या घटनेमुळे गावात काहीकाळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. घटनेची माहिती समजताच हिरेबागेवाडीचे पोलीस उपनिरीक्षक अविनाश यरगोप्प व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन माहिती जाणून घेतली. दोन्ही गटातर्फे परस्पर विरोधी फिर्यादी दाखल करण्यात आल्याने पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेत तपास चालविला आहे.
पैशावरून झाला वाद
अंकुश अशोक पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, आरोपी अर्जुन ओमाण्णा पाटील आणि जखमी मंगाण्णा अशोक पाटील या दोघांमध्ये पैशावरून वाद झाला होता. याबाबत विचारणा करण्यासाठी गेले असताना वरील सात जणांनी मंगाई गल्ली येथे सार्वजनिक रस्त्यावर भांडण काढले. खून करण्याच्या उद्देशाने विळा, लाठ्याकाठ्या, विटा तसेच हाताने मारहाण केल्याने अशोक पाटील, मंगाण्णा पाटील, आकाश पाटील हे गंभीर जखमी झाले. तसेच फिर्यादी अंकुश हादेखील किरकोळ जखमी झाला. आरोपींनी मारहाण करण्यासह अर्वाच्य शब्दात शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली. फिर्यादी अंकुश याने सर्व जखमींना कारगाडीतून उपचारासाठी रुग्णालयाकडे नेण्याच प्रयत्न केला. मात्र संशयितांनी कारगाडी अडवून विटा तसेच लाठ्याकाठ्यांनी हल्ला करून कारगाडीची काच फोडून नुकसान केले.









