जिरीबाममध्ये गोळीबारानंतर घरांचीही जाळपोळ
वृत्तसंस्था/ इंफाळ
शांतता प्रस्थापित करण्याच्या करारानंतर 24 तासांच्या आत मणिपूरच्या जिरीबाममध्ये पुन्हा हिंसाचार उसळला. जिरीबामच्या लालपाणी गावात शुक्रवारी रात्री सशस्त्र गटाने अनेक राऊंड गोळीबार केला. तसेच एका घराला आगही लावण्यात आली. मात्र, तेथे कोणीही राहत नसल्याने जीवितहानी टळली. लालपाणीमध्ये मैतेई लोकांची घरे आहेत. जिह्यात हिंसाचार भडकल्यानंतर येथील बहुतांश लोकांनी आपली घरे सोडली होती. सुरक्षा व्यवस्थेतील ढिलाईचा फायदा घेत हल्लेखोरांनी येथे गोळीबार केला. मात्र, हल्लेखोरांची ओळख अद्याप पटलेली नाही.
या घटनेनंतर परिसरात सुरक्षा दल पाठवण्यात आले आहे. आसाममधील कचारला लागून असलेल्या सीआरपीएफ ग्रुप सेंटरमध्ये झालेल्या बैठकीनंतर मैतेई आणि कुकी समुदायांनी गुऊवार, 1 ऑगस्ट रोजी शांतता करारावर स्वाक्षरी केली. जिह्यातील परिस्थिती सामान्य करण्यासाठी आणि जाळपोळ आणि गोळीबाराच्या घटना थांबविण्याबाबत दोन्ही समुदायांनी चर्चा केली होती. दोन्ही बाजूंनी सुरक्षा दलांना पूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासनही दिले होते. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी पुन्हा हिंसाचार झाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
गेल्यावषी मे महिन्यापासून राज्यात सुरू झालेल्या हिंसाचारात आतापर्यंत 226 लोकांचा मृत्यू झाला आहे. तसेच 39 लोक बेपत्ता आहेत. 11,133 घरांना आग लावण्यात आली असून त्यापैकी 4,569 घरे पूर्णपणे नष्ट झाली आहेत. हिंसाचाराच्या संदर्भात एकूण 11,892 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. 59,414 विस्थापित लोक मदत छावण्यांमध्ये आहेत. विस्थापितांसाठी वेगवेगळ्या भागात 302 मदत छावण्या उभारण्यात आल्या आहेत.









