इंटरनेट बंद, 34 जणांना अटक : दुकाने-वाहनांची तोडफोड
वृत्तसंस्था/ कोलकाता
पश्चिम बंगालमधील मालदा जिल्ह्यातील मोथाबारी येथे दोन गटांमध्ये झालेल्या हिंसाचार प्रकरणी 34 जणांना अटक करण्यात आली आहे. या हिंसाचारामुळे सदर परिसरात इंटरनेट बंद आहे. परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्यासाठी सशस्त्र आणि जलद कृती दलाच्या तीन कंपन्या तैनात करण्यात आल्या आहेत. 26 मार्च रोजी मोथाबारी मशिदीत नमाज पठण सुरू असताना तेथून एक मिरवणूक जात होती, तेव्हा काही लोकांनी धार्मिक घोषणाबाजी केल्यापासून या भागात हिंसाचार पसरला आहे. यादरम्यान जमावाने दुकाने, घरे आणि वाहनांची तोडफोड करतानाच लुटमार केल्याचेही उघड झाले आहे.
गेल्या दोन-तीन दिवसांपासून मालदा येथे हिंसाचाराचे पडसाद उमटत आहेत. याप्रकरणी उच्च न्यायालयाने हिंसाचाराच्या संदर्भात 3 एप्रिलपर्यंत जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांकडून कारवाईचा अहवाल मागितला आहे. न्यायालयाने सरकारला याप्रकरणी महत्त्वाचे निर्देशही दिले आहेत. राज्याने सावधगिरीने काम करावे. तसेच, हिंसाचारामुळे प्रभावित झालेल्या लोकांचे संरक्षण करण्यासाठी योग्य पावले उचलली पाहिजेत, असे म्हटले आहे.
हिंसाचारानंतर पोलिसांचा लाठीमार
निषेध आंदोलनादरम्यान लोक धार्मिक झेंडे घेऊन होते. घोषणाबाजी करणारे लोक अचानक हिंसक झाले आणि त्यांनी दुकाने आणि घरांची तोडफोड केली. तसेच सामानसुमान लुटत रस्त्यावर उभ्या असलेल्या वाहनांना आग लावली. गर्दीला नियंत्रित करण्यासाठी पोलिसांनी लाठीमार केला आणि अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या. मालदा पोलिसांनी लोकांना शांतता राखण्याचे आवाहन केले. सोशल मीडियावरील कोणत्याही प्रकारच्या अफवांवर किंवा चुकीच्या माहितीवर लक्ष देऊ नका. काही लोक जाणूनबुजून हिंसाचार भडकवण्याचा प्रयत्न करत आहेत, असे पोलिसांनी म्हटले आहे.









