41 कैद्यांचा मृत्यू. महिला कैद्यांना जिवंत पेटविले
वृत्तसंस्था/ तेगुसिगाल्पा
होंडुरासच्या एका महिला तुरुंगात मंगळवारी झालेल्या हिंसेत कमीतकमी 41 महिला कैद्यांचा मृत्यू झाला आहे. तेगुसिगाल्पापासून सुमारे 50 किलोमीटर अंतरावरील तमारा येथील महिला तुरुंगात दंगल अन् हिंसा झाल्याची माहिती हेंडुरासच्या राष्ट्रीय पोलीस संस्थेचे प्रवक्ते यूरी मोरा यांनी दिली आहे. तुरुंगात बहुतांश महिलांचा मृत्यू होरपळून झाला आहे. तर काही महिलांवर गोळ्याही झाडण्यात आल्या होत्या. या हिंसेत जखमी झालेल्या महिलांना तेगुसिगाल्पा येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तुरुंगांमधील अवैध कारवाया रोखण्यासाठी उचलण्यात आलेल्या पावलांच्या पार्श्वभूमीवर ही हिंसा झाली आहे. तुरुंगातील अवैध प्रकार रोखण्याची कारवाई आम्ही यापुढेही सुरुच ठेवणार आहोत असे होंडुरासच्या तुरुंग विभागाच्या प्रमुख जुलिसा विलानुएवा यांनी सांगितले आहे.

26 महिला कैद्यांना जिवंत जाळण्यात आले आहे. तर उर्वरित महिलांना गोळ्या घालून ठार करण्यात आल्याची माहिती मोरा यांनी दिली. होंडुरास येथील तुरुंगात क्षमतेपेक्षा अधिक कैदी ठेवण्यात आले आहेत. अशा स्थितीत तेथील तुरुंगांमध्ये वारंवार दंगली होत असतात. 2019 मध्ये देखील अशाचप्रकारच्या एका हिंसेत 37 कैद्यांचा मृत्यू झाला होता. हिंसक घटना रोखण्यासाठी देशाचे अध्यक्ष हर्नांडेज यांनी तुरुंगाचे नियंत्रण सैन्याच्या हाती सोपविले हेते.









