‘वंगबंधूं’च्या घरावर हल्ला, तोडफोड, जाळपोळ
वृत्तसंस्था/ढाका
बांगलादेशमध्ये इस्लामी कट्टरवाद्यांनी पुन्हा हिंसाचार भडकविला आहे. बांगलादेशच्या स्वातंत्र्यसंग्रामात महत्वाची भूमिका साकारलेले दिवंगत नेते शेख मुजिबूर रहमान (वंगबंधू) यांच्या घरावर हिंसक जमावाने हल्ला केला असून घराची प्रचंड मोडतोड केली आहे. घराला आगही लावण्यात आली. ही घटना बुधवारी मध्यरात्रीनंतर घडली आहे. शेख मुजिबूर रहमान हे बांगलादेशचे संस्थाप असून ते भारतात वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशच्या पदच्युत नेत्या शेख हसीना यांचे पिता आहेत. त्यांनी पाकिस्तानच्या तावडीतून बांगलादेशची सुटका केली होती. शेख हसीना यांच्या आवामी लीग या पक्षाने बुधवारी बांगलादेशात सर्वत्र, निषेध मोर्चे आणि निदर्शनांचे आयोजन केले होते. बांगलादेशचे सध्याचे प्रशासन लोकांच्या इच्छेविरोधात स्थापन करण्यात आले आहे. त्यामुळे या प्रशासनाला सत्ता गाजविण्याचा अधिकार नाही. देशात लवकरात लवकर सार्वत्रिक निवडणूक होणे आवश्यक आहे. यासाठी या आंदोलनाची घोषणा करण्यात आली होती.
आंदोलनापूर्वी हिंसाचार
मात्र, बुधवारी आंदोलनाला प्रारंभ होण्यापूर्वी रात्री उशिरा मुजिबूर रहमान यांच्या घरावर हल्ला करण्यात आला. ढाका येथे रहमान यांच्या कुटुंबाचे निवासस्थान आहे. त्यावर हल्ला करण्यात आला. निवासस्थानात घुसून तोडफोड करण्यात आली. शेख हसीना यांचे चुलत बंधू शेख सोहेल आणि शेख जेवेल यांच्या घरांवरही हल्ले करण्यात आले. हा अवामी लीगच्या नेत्यांना घाबरविण्याचा प्रयत्न आहे. तथापि, आम्ही आमचे आंदोलन करणार आहोत, असे या पक्षाने स्पष्ट केले आहे. शेख हसीना यांनीही भारतातून संदेश पाठवून पक्षाला उत्साह वाढविला.
बुलडोझर मिरवणूक
शेख हसीना यांच्या कुटुंबाच्या घरावर हल्ला करण्यासाठी बुलडोझर मिरवणूक काढण्याचे आवाहन इंटरनेटच्या माध्यमातून करण्यात आले होते. त्यानंतर बुधवारी मध्यरात्री दंगलखोरांचा जमाव जमण्यास प्रारंभ झाला. काही लोकांनी बुलडोझरही आणले होते. मुजिबूर रहमान यांच्या घराचा मोठा भाग बुलडोझर लावून पाडण्यात आला. यावेळी घटनास्थळी पोलिसांची उपस्थिती होती. तथापि, त्यांना दंगलखोरांना आवरले नाही, असा आरोप करण्यात येत आहे. यामुळे दंगलखोरांना मोकळे रान मिळाले. त्यांनी आवामी लीगच्या अन्य इमारतींचीही मोठ्या प्रमाणात हानी केली.
शेख हसीना यांचा संदेश
एक घर नाहीसे करण्यात आले असले तरी त्यामुळे इतिहास पुसला जाऊ शकत नाही. आमच्या घरातील संग्रहालय जाळले गेले तरी स्मृती मिटविल्या जाऊ शकत नाहीत. मी माझ्या देशासाठी अनेक चांगली कामे केली आहेत. तरीही, आमच्यावर हा अन्याय होत आहे. दंगलखोरांनी हे लक्षात ठेवावे, की अशा अत्याचारांचा सूड काळच उगवत असतो, असा संदेश शेख हसीना यांनी दिला.
बंधने हटविण्याची मागणी
शेख हसीना यांच्यावर बांगलादेश प्रशासनाने अनेक अन्याय्य बंधने घातली आहेत. ती हटविण्याची मागणी अवामी लीग या पक्षाने केली आहे. 5 फेब्रुवारीला शेख हसीना यांनी बांगलादेश सोडून सहा महिन्यांचा कालावधी पूर्ण झाला आहे. या निमित्ताने बांगलादेशात आंदोलन करण्याची योजना अवामी लीग पक्षाने आखली होती. त्याआधीच मुजिबूर रहमान यांच्या घरावर हल्ला करण्यात आला. आपल्या समर्थकांना ऑनलाईन संदेश देण्याची हसीना यांची योजना होती.
हसीना झाल्या भावुक
शेख हसीना यांनी आपल्या घराची मोडतोड आणि जाळपोळ होत असलेली दृष्ये इंटरनेटवर पाहिली आणि त्या भावुक झाल्या. कितीही अन्याय झाला, तरी आपण संघर्ष सोडणार नाही. बांगलादेशात पुन्हा लोकनियुक्त सरकार स्थापन होईपर्यंत आपला लढा होत राहील, असा निर्धार त्यांनी नंतर व्यक्त केला.









