वृत्तसंस्था/ इंफाळ
मणिपूरच्या जिरीबाम जिल्ह्यात शनिवार, 28 सप्टेंबर रोजी पुन्हा हिंसाचार उसळला. सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास मोंगबुंग मैतेई गावात संशयित हल्लेखोरांनी अंदाधुंद गोळीबार केला. या हल्ल्याला गावातील स्वयंसेवकांनी प्रत्युत्तर दिल्यानंतर तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. तणाव वाढल्यामुळे महिला, लहान मुले आणि वृद्धांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आले. दुसरीकडे, चुराचंदपूर आणि कांगपोकपी जिल्ह्यात शनिवारीही बंद पुकारण्यात आला होता. या बंददरम्यान बाजारपेठा बंद राहिल्याने रस्तेही निर्जन दिसत होते. कुकी समुदायाने येथे बंदची हाक दिली होती.









