सशस्त्र जमावाची गावात घुसखोरी : गोळीबारात कुकी समाजाच्या तिघांचा मृत्यू
वृत्तसंस्था/ इंफाळ
मणिपूरमधील हिंसाचार थांबण्याचे नाव घेत नाही आहे. गेल्या काही दिवसांच्या शांततेनंतर राज्यात पुन्हा एकदा हिंसाचार उसळला आहे. शुक्रवारी पहाटे 5.30 च्या सुमारास मणिपूरच्या उखऊल जिह्यातील लिटन पोलीस स्थानकाअंतर्गत थवाई गावात मैतेई समुदायाचा सशस्त्र जमाव आणि कुकी स्वयंसेवक यांच्यात गोळीबार झाला. या गोळीबारात तीन कुकी लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. या घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण आहे. गोळीबाराच्या या घटनेनंतर परिसरातील सुरक्षा वाढविण्यात आली आहे.
सुरक्षा दलांनी संपूर्ण परिसराला वेढा घातला असून शोधमोहीम सुरू केली आहे. मैतेई समुदायाच्या जमावाने सुरुवातीला गावातील ड्युटी पोस्टवर हल्ला केला. गावाच्या सुरक्षेसाठी कर्तव्यावर तैनात करण्यात आलेल्या सुरक्षा चौकीतील स्वयंसेवकांवर हल्ला केल्यानंतर जमावाने वस्तीमध्ये प्रवेश केला. यावेळी झालेल्या गोळीबारात तीन जण ठार झाल्याची माहिती आहे. जामखोगिन हाओकीप (26), थांगखोकाई हाओकीप (35) आणि होलेन्सन बाईट (24) अशी ठार झालेल्यांची नावे आहेत. या घटनेचा तपास पोलिसांकडून हाती घेण्यात आला असून तिघांचा मृत्यू झाल्याचा दुजोरा पोलीस अधिकाऱ्यांनी दिला आहे.
““““““““““““““““““““““““““““““““““““““““““““““““““““““““““““““““““““““““““““““““““““““““““““““““““`
हिंसाचाराग्रस्त मणिपूरमधील स्थितीचा आढावा घेण्यासाठी सीपीआय(एम) नेत्यांची एक टीम मणिपूरला पोहोचली आहे. सीताराम येचुरी यांच्या नेतृत्वाखाली चार नेत्यांचे हे पथक 20 ऑगस्टपर्यंत राज्याच्या दौऱ्यावर असणार आहे. आम्ही मणिपूरच्या लोकांसोबत एकता व्यक्त करणार आहोत, असे येचुरी यांनी स्पष्ट केले. राज्यात शांतता प्रस्थापित करण्यासाठी जे आवश्यक असेल ते आम्ही करू. राज्यातील परिस्थिती धोकादायक असून देशाच्या एकात्मतेसाठी त्यावर नियंत्रण ठेवणे आवश्यक असल्याचे वक्तव्यही त्यांनी केले.









