तृणमूलच्या दोन गटांमध्येच हिंसक झटापट : बांकुडामध्ये बॉम्ब हस्तगत
वृत्तसंस्था/ कोलकाता
पश्चिम बंगालमध्ये 8 जुलै रोजी होणाऱ्या स्थानिक निवडणुकीपूर्वी सातत्याने हिंसक घटना घडत आहेत. दक्षिण 24 परगणा जिल्ह्यातील कॅनिनमध्ये बुधवारी उमेदवारी अर्ज भरताना राज्यातील सत्तारुढ तृणमूल काँग्रेसच्या दोन गटांमध्ये हिंसक झटापट झाली आहे. दोन्ही गटांनी परस्परांवर बॉम्ब फेकले आहेत.

तर तृणमूल नेते सैबल लाहिडी यांच्या नेतृत्वात पक्षाच्या कार्यकर्त्यांनी वाहतूक रोखली. तृणमूल काँग्रेसच्या दुसऱ्या गटाने उमेदवारी अर्ज भरण्यापासून रोखल्याचा आरोप लाहिडी यांनी केला आहे. हा दुसरा गट तृणमूल आमदार परेश राम यांचा निकटवर्तीय असल्याचे मानले जाते. बांकुडा जिल्ह्यात पोलिसांनी तपासणीदरम्यान एका कारमधून 12 हून अधिक बॉम्ब हस्तगत केले आहेत. याप्रकरणी पोलिसांनी कार ताब्यात घेत 8 जणांना अटक केली आहे.
केंद्रीय दलांना तैनात करावे
स्थानिक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यास आता केवळ दोन दिवस शिल्लक राहिले आहेत. कलकत्ता उच्च न्यायालयाने उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत वाढविण्याची मागणी फेटाळली आहे. तसेच न्यायालयाने राज्यातील हिंसक घटना पाहता केंद्रीय सुरक्षा दलांना तैनात करण्याचा निर्देश दिला आहे.
आयएसएफ अन् तृणमूलमध्ये संघर्ष
यापूर्वी 13 जून रोजी इंडियन सेक्युलर फ्रंट (आयएसएफ) आणि तृणमूल काँग्रेस यांच्या समर्थकांमध्ये हिंसक झटापट झाली होती. तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आयएसएफ उमेदवारांना अर्ज भरण्यापासून रोखल्याचा आरोप आहे. तर 9 जून रोजी मुर्शिदाबाद जिल्ह्यात काँग्रेसच्या एका कार्यकत्याची गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. पश्चिम बंगालमध्ये 8 जुलै रोजी ग्रामपंचायत निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. तर 11 जुलै रोजी मतमोजणी केली जाणार आहे.









