शाळांवरील हल्ले रोखण्याचे नाहेलच्या आजीचे आवाहन
वृत्तसंस्था/ पॅरिस
फ्रान्समध्ये 17 वर्षीय मुलाचा पोलिसांच्या हातून मृत्यू झाल्यावर सुरू झालेल्या हिंसेत आतापर्यंत मोठे नुकसान झाले आहे. हिंसा रोखण्यासाठी सुरक्षा दलांनी कारवाईला वेग दिला असून पोलिसांनी रविवारी 49 दंगलखोरांना अटक केली आहे. तत्पूर्वी शनिवारी 719 तर शुक्रवारी 1300 जणांना अटक करण्यात आली होती. फ्रान्समध्ये आतापर्यंत 3 हजारांहून अधिक जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.
दंगली संपल्याचे म्हणणे सध्या घाईचे ठरणार आहे. नुकसान कमी झाले असले तरीही आम्ही यापुढेही पूर्ण खबरदारी बाळगणार आहोत असे पॅरिस पोलीस प्रमुखांनी म्हटले आहे. तर पोलिसांच्या गोळीबारात मारले गेलेल्या नाहेलच्या आजीने लोकांना दंगली न करण्याचे आवाहन केले आहे. दंगली थांबवा, गोष्टी नष्ट करणे बंद करा, शाळांवर हल्ले करू नका असे त्यांनी म्हटले आहे. त्यांच्या आवाहनानंतर हिंसेत घट झाल्याचे दिसून आले आहे.
27 जून रोजी फ्रान्सची राजधानी पॅरिसचा उपनगरीय भाग नेन्तेरेमध्ये दोन पोलीस अधिकाऱ्यांनी एक कार रोखली होती. यादरम्यान वाद झाल्याने पोलीस अधिकाऱ्याने कार चालविणाऱ्या 17 वर्षीय नाहेलवर गोळी झाडली होती. या गोळीबारात नाहेलचा मृत्यू झाला होता. यानंतर देशात हिंसा भडकली असून ती अद्याप सुरू आहे.
अटक झालेल्यांमध्ये अल्पवयीन मोठ्या प्रमाणात
फ्रान्समध्ये दंगलींमुळे ताब्यात घेण्यात आलेले बहुतांश आरोपी हे अल्पवयीन आहेत. 2 हजारांहून अधिक आरोपींचे वय 18 वर्षांपेक्षा कमी असल्याची माहिती फ्रान्सचे गृहमंत्री गेराल्ड डरमनिन यांनी दिली आहे. हिंसेत 50 हून अधिक पोलीस जखमी झाले आहेत. दंगलखोरांनी 26 पोलीस स्थानकांसमवेत 74 इमारतींना नुकसान पोहोचविले आहे. 577 हून अधिक वाहनांना आगीच्या हवाली करण्यात आले आहे.
फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी सोमवारी संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या नेत्यांशी चर्चा केली आहे. तर मॅक्रॉन हे मंगळवरी 220 शहरांच्या महापौरांना भेटून सद्यस्थितीवर चर्चा करणार आहेत.









