दोन घटनांमध्ये चार गावकऱ्यांची हत्या : पहिल्या टप्प्यापूर्वी निवडणूक कर्मचाऱ्यांनाही इशारा
वृत्तसंस्था /कांकेर
छत्तीसगडमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या 2023 च्या पहिल्या टप्प्यासाठी 7 नोव्हेंबरला मतदान होणार आहे. राज्यातील नक्षलग्रस्त भाग असलेल्या बस्तर विभागातील 12 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान होणार आहे. आता निवडणुकीपूर्वी दहशत पसरवण्याच्या उद्देशाने नक्षलवाद्यांनी मोठी घटना घडवून आणली आहे. निवडणुकीपूर्वी नक्षलग्रस्त विजापूर आणि कांकेर जिल्ह्यात बुधवारी आणि गुऊवारी मध्यरात्री दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये नक्षलवाद्यांनी 4 जणांची हत्या केली. पोलिसांचे खबरे असल्याच्या संशयावरून नक्षलवाद्यांनी या चौघांची हत्या केल्याची माहिती सूत्रांनी दिली. तसेच 7 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या निवडणुकीसाठी मतदान केंद्रावर न जाण्याचा इशारा नक्षलवाद्यांनी निवडणूक अधिकाऱ्यांना दिल्याची माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली.
कांकेर जिल्ह्यातील छोटे बिटिया पोलीस ठाण्यातील महाराष्ट्र सीमेजवळील मोरखंडी गावात बुधवार-गुऊवारी मध्यरात्री नक्षलवाद्यांनी तीन गावकऱ्यांची हत्या केली. हत्येसोबतच नक्षलवाद्यांनी हे तिघे महाराष्ट्र सी-60 गडचिरोली स्पेशल टीमचे गुप्तहेर असल्याचा आरोप करणारे एक पत्रकही टाकले आहे. 35 वषीय कुल्ले कतलामी, 22 वषीय मनोज कोवाची, 27 वषीय दुग्गे कोवाची अशी ठार झालेल्या गावकऱ्यांची नावे आहेत. सर्व मृत तऊण छोटे बिटिया पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मोरखंडी गावचे रहिवासी आहेत. मोरखंडी ग्रामस्थांनी तिघांचे मृतदेह आपल्या गावी आणले आहेत. मोरखंडी हे गाव छोटे बिटिया कांकेरपासून 13 किलोमीटर अंतरावर आहे. सर्व मृत पखंजूर येथील मोरखंडी भागातील असल्याचे सांगण्यात येत आहे.
विजापूरमध्ये एकाची हत्या
कांकेरमधील घटनेपूर्वी विजापूर जिल्ह्यात संशयित नक्षलवाद्यांनी एका 40 वषीय व्यक्तीची पोलीस खबऱ्या असल्याच्या संशयावरून हत्या केली. प्राथमिक माहितीनुसार मध्यरात्री नक्षलवाद्यांनी मुचकी लिंगा नावाच्या व्यक्तीची दोरीने गळा आवळून हत्या केली. त्याचा मृतदेह विजापूर जिल्ह्यातील गलगाम आणि नदापल्ली गावांदरम्यान रस्त्याच्या कडेला फेकून दिला होता. पोलिसांना या प्रकरणाची माहिती मिळताच पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले होते.
पोलीस नक्षलवाद्यांच्या शोधात
पोलीस अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, नक्षलवाद्यांनी लिंगा हा पोलिसांचा खबरी असल्याचा आरोप केला होता. पोलिसांना या प्रकरणाची माहिती मिळताच पोलिसांचे पथक घटनास्थळी रवाना झाले. नक्षलवाद्यांचा शोध घेण्यासाठी सुरक्षा दलांनी परिसरात शोधमोहीम सुरू केली आहे. दरम्यान, या परिसरात मतदान शांततेत पार पडावे यासाठी सर्व आवश्यक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात येणार असल्याचे पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.
निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याची घोषणा
राज्यात विधानसभा निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर बस्तरमध्ये अनेक ठिकाणांहून निवडणूक बहिष्काराचे आवाहन करणारे नक्षलवादी बॅनर आणि पॅम्प्लेट सापडले आहेत. प्रतिबंधित कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाच्या (माओवादी) पश्चिम बस्तर विभाग समितीने मतदान कर्मचाऱ्यांना या भागातील मतदान केंद्रावर न येण्याचा इशारा देणारी एक प्रेस नोट जारी केली आहे. विजापूरमध्ये 7 नोव्हेंबरला मतदान होत असून त्यासाठी तुम्ही (निवडणूक अधिकारी व कर्मचारी) तयारीला सुरुवात केली असेल, असे नमूद करतानाच या निवडणुकांवर बहिष्कार टाकण्याचे आवाहन माओवादी गटाकडून करण्यात आले आहे. विजापूरमध्ये 245 मतदान केंद्रे असून 6-7 नोव्हेंबरला तुम्ही ईव्हीएम घेऊन दाखल व्हाल. तुमच्यासोबत पोलिसांचा ताफा असला तरीही तुमच्या जीवाला धोका निर्माण होण्याची शक्मयता अधिक आहे. त्यामुळे आम्ही तुम्हाला आवाहन करतो की, तुमची सुरक्षितता लक्षात घेऊन तुम्ही मतदान केंद्रावर जाऊ नका, असे आवाहनही करण्यात आले आहे. बुधवारी यासंबंधीचे निवेदन प्रसिद्ध करण्यात आले आहे.
राज्यात दोन टप्प्यात मतदान
90 विधानसभा जागा असलेल्या छत्तीसगडमध्ये दोन टप्प्यात विधानसभा निवडणुका होणार आहेत. राज्यात पहिल्या टप्प्यातील मतदान 7 नोव्हेंबरला होणार आहे. या दिवशी 20 जागांवर मतदान होणार आहे. उर्वरित जागांसाठी 17 नोव्हेंबरला मतदान होणार आहे. 3 डिसेंबरला मतमोजणी होणार आहे.









