गोळीबारात दोन निदर्शकांचा मृत्यू : कालवा प्रकल्पाला तीव्र विरोध
वृत्तसंस्था/ कराची
पाकिस्तान सध्या चहुबाजूने संकटात सापडला आहे, एकीकडे बलुचिस्तानात अस्थिरता तर दुसरीकडे त्याचा सिंध प्रांत देखील हिंसेच्या तावडीत सापडला आहे. सिंधमधील लोक वादग्रस्त 6-कालवा प्रकल्पांना विरोध करत आहेत. याच प्रकल्पाच्या विरोधात निदर्शने करणाल्या लोकांनी सिंधचे गृहमंत्री जियाउल हसन लंजर यांच्या नौशहरो फिरोज जिल्ह्यातील निवासस्थानाला पेटवून दिले आहे. निदर्शकांनी संपत्तीची तोडफोड देखील केली आहे.
निदर्शकांनी राष्ट्रीय महामार्गानजीक मोरो शहरातील मंत्र्याच्या निवासस्थानाला लक्ष्य केले आणि नजीक उभ्या असलेल्या दोन ट्रेलरांना आग लावली. यादरम्यान निदर्शक आणि पोलीस यांच्यात संघर्ष झाला असून यात दोन निदर्शकांना जीव गमवावा लागला आहे. तर अनेक पोलीस जखमी झाले आहेत.
चोलिस्तान कालव्याचा मुद्दा पाकिस्तान पीपल्स पार्टीच्या नेतृत्वाखालील सिंध सरकार आणि पाकच्या शाहबाज शरीफ सरकारदरम्यान वादाचा मुद्दा ठरला आहे. पाकिस्तानचे शाहबाज सराकर चोलिस्तान वाळवंटात सिंचनासाठी सिंधू नदीवर 6 कालव्यांच्या निर्मितीसाठी आग्रही आहे. तर पीपीपी आणि सिंध प्रांतातील अन्य राजकीय पक्ष या प्रकल्पाला विरोध करत आहेत.
चोलिस्तान कालव्यांच्या जाळ्यासाठी 211.4 अब्ज रुपयांचा खर्च येणार आहे. तर या प्रकल्पाच्या अंतर्गत 4 लाख एकर जमिनीवर शेती करण्याची योजना आहे. परंतु सिंधमध्ये या प्रकल्पाला मोठा विरोध होत असून यात राजकीय पक्ष, धार्मिक संघटना, वकील निदर्शने करत आहेत. प्रकल्पाच्या विरोधात पूर्ण सिंधमध्ये निदर्शने करण्यात आली आहेत. याचमुळे मागील महिन्यात या प्रकल्पाला कॉमन इंटरेस्ट्स कौन्सिलने मंजुरी नाकारली होती.
या पार्श्वभूमीवर पाकिस्तानच्या पंतप्रधान कार्यालयाने सर्व प्रांतांदरम्यान परस्पर सहमती आणि सर्वसहमतीशिवाय कुठलाही कालवा तयार केला जाणार नसल्याचे वक्तव्य जारी करत म्हटले होते. तरीही सिंधमध्ये प्रकल्पाच्या विरोधात निदर्शने सुरू आहेत.









