राज्यातील मुक्त वाहतुकीच्या पहिल्या दिवशी गोंधळ : कुकी समुदायाच्या सदस्यांनी बस रोखल्या
वृत्तसंस्था/ इंफाळ
मणिपूरमध्ये जवळजवळ दोन वर्षांनी कुकी आणि मैतेईबहुल भागात मुक्त वाहतूक सुरू होताच शनिवारी हिंसाचार उसळला. इंफाळ, चुराचंदपूर, कांगपोकपी, बिष्णुपूर आणि सेनापतीला जोडणाऱ्या रस्त्यांवर बसेस धावू लागताच कुकी समुदायाच्या लोकांनी निषेध करण्यास सुरुवात केली. यावेळी आंदोलकांनी रस्त्यांवर दगडफेक करून वाहतूक रोखली. रस्त्यांच्या आजूबाजूची झाडे तोडून रस्ते अडवण्यात आले. अनेक ठिकाणी वाहने पार्क करून रस्ते बंद करण्यात आले होते. इतकेच नाही तर काही बसेस आणि गाड्यांना आगही लावण्यात आली. हिंसाचार करणाऱ्या लोकांना रोखण्यासाठी सुरक्षा दलांनी लाठीमार केला आणि अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या.
सुरक्षा दल आणि निदर्शकांमध्ये झालेल्या संघर्षात शेकडो लोक जखमी झाले आहेत. तसेच पेलेट गनचा वापर होत असल्याच्या बातम्या येत आहेत. काही छायाचित्रे आणि व्हिडिओंमध्ये जखमींच्या शरीरावर पेलेट गनच्या गोळ्यांचे निशाण दिसत आहेत. मात्र, पोलिसांनी अद्याप याला दुजोरा दिलेला नाही. इंफाळ, चुराचंदपूर, कांगपोकपी, बिष्णुपूर आणि सेनापती भागात जाणाऱ्या सरकारी बसेस सीआरपीएफ आणि स्थानिक पोलिसांच्या संरक्षणाखाली चालवल्या जात आहेत. याशिवाय रेड झोन भागात विविध ठिकाणी सुरक्षा दल तैनात करण्यात आले आहे.
आंदोलकांचा बसेसवर हल्ला
शनिवारपासूनच पूर्ण क्षमतेने सुरू झालेल्या बसेस आणि इतर वाहनांची वाहतूक रोखण्यासाठी निदर्शकांनी रस्त्यांवर दगडफेक करत बसेस आणि गाड्यांना आग लावली. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी सुरक्षा दलांना लाठीचार्ज करावा लागला आणि अश्रूधुराच्या नळकांड्या फोडाव्या लागल्या. या संघर्षात शेकडो लोक जखमी झाले आहेत.
सुरक्षा कडक
राज्याच्या काही भागात निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने सीआरपीएफ आणि स्थानिक पोलिसांची तैनाती वाढवली आहे. विशेषत: रेड झोन म्हटल्या जाणाऱ्या भागात अतिरिक्त सुरक्षा दल तैनात करण्यात आले आहेत. सामान्य नागरिकांना दिलासा मिळावा म्हणून सरकारी बसेसही सुरक्षेत चालवल्या जात आहेत. कुकी समुदायाचा वरचष्मा असलेल्या भागात अतिरिक्त फौजफाटा पाठविण्यात आल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.
अमित शहा यांच्याकडून मुक्त संचाराची घोषणा
1 मार्च रोजी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मणिपूरमधील परिस्थितीवर गृह मंत्रालयात आढावा बैठक घेतली होती. या बैठकीत गृहमंत्र्यांनी 8 मार्चपासून मणिपूरमधील सर्व रस्त्यांवर विनाअडथळा वाहतूक सुनिश्चित करण्याचे निर्देश दिले होते. रस्ते अडवणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे निर्देशही त्यांनी दिले होते. मात्र, विशिष्ट समुदायाच्या मोठ्या जमावाने मुक्त वाहतुकीच्या पहिल्याच दिवशी वाहतुकीत अडथळा निर्माण करत सुरक्षा यंत्रणांसमोर आव्हान निर्माण केले आहे.
परिस्थिती पूर्ववत होईल : मुख्य सचिव
राज्यात सामान्य परिस्थिती पूर्ववत करण्यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करत आहोत. राजधानी इंफाळ आणि चुराचांदपूर दरम्यान हेलिकॉप्टर सेवा 12 मार्चपासून सुरू होईल. सार्वजनिक वाहतुकीत अडथळा आणण्याचा कोणताही प्रयत्न केल्यास कडक कारवाई केली जाईल, असे मणिपूरचे मुख्य सचिव पी. के. सिंह यांनी सांगितले.
मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्यानंतर राष्ट्रपती राजवट
मणिपूरमध्ये सध्या राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आलेली आहे. 9 फेब्रुवारी रोजी एन. बिरेन सिंह यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर 13 फेब्रुवारी रोजी मणिपूरमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली. राज्यपाल अजय कुमार भल्ला यांनी दंगलखोरांना लुटलेली सर्व शस्त्रs परत करण्यास सांगितले होते. आतापर्यंत 500 हून अधिक शस्त्रs आत्मसमर्पण करण्यात आली आहेत.









