हल्लेखोरांच्या गोळीबारात तिघे गंभीर जखमी
वृत्तसंस्था/ इंफाळ
मणिपूरमध्ये हिंसाचार सुरूच आहे. 3 मेपासून सुरू झालेल्या हिंसाचारात आतापर्यंत 180 जणांना जीव गमवावा लागला आहे. शुक्रवारी पुन्हा जोरदार गोळीबार झाल्याची घटना घडली असून त्यामध्ये 3 जण गंभीर जखमी झाले आहेत. पूर्व इंफाळमध्ये हिंसाचार झाल्याची माहिती सुरक्षा सूत्रांकडून देण्यात आली. येथील कांगपोकपी जिह्यातील सबुंगखोक खुनौ येथे सशस्त्र हल्लेखोरांनी गावकऱ्यांना लक्ष्य केले. सकाळी हल्लेखोरांनी जमिनीत ठेवलेल्या विटांच्या ढिगाऱ्याआड लपून लोकांवर अंदाधुंद गोळीबार केला. जखमींना इंफाळमधील राज मेडिसिटी आणि लिटल हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले असून तेथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
या घटनेदरम्यान हल्लेखोरांनी गावातील सुरक्षा स्वयंसेवकांवरही गोळीबार केला. सुरक्षा दलांनी गावाकडे जाणाऱ्या हल्लेखोरांचा पाठलाग केला. त्यानंतर हल्लेखोरांनी सुरक्षा दलांवरही गोळीबार केला. मात्र, या संघर्षात कोणालाही त्याचा फटका बसला नाही. सुरक्षा दलाचा पाठलाग पाहून हल्लेखोर आपले वाहन घटनास्थळीच सोडून पळून गेले. या वाहनात पोलिसांना मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा सापडला आहे.
मणिपूर हिंसाचारामुळे 50 हजार लोकांनी आपली घरे सोडली आहेत. हे लोक सध्या मदत छावण्यांमध्ये आहेत. 3 मे पासून कुकी आणि मैतेई समुदायातील लोकांमध्ये हिंसाचार सुरू आहे. यात 180 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे.









