जमावाच्या हल्ल्यात मध्यरात्री तिघांचा मृत्यू
वृत्तसंस्था/ इंफाळ
तब्बल दोन महिन्यांनंतरही मणिपूरमधील हिंसाचार थांबण्याचे नाव घेत नाही. इंफाळसह राज्याच्या काही भागात अजूनही हिंसा भडकत आहे. शनिवारी रात्री उशिरा बिष्णुपूर जिल्ह्यात पुन्हा एकदा मैतेई समुदायाचे तीन लोक गोळीबारात ठार झाले. कुकी समुदायातील जमावाने हा हल्ला केल्याचा दावा केला जात आहे. बिष्णुपूर जिह्यातील खुंबी पोलीसस्थानक क्षेत्रात ही घटना घडली.
विष्णुपूरमध्ये शनिवारी मध्यरात्रीनंतर 12.30 वाजण्याच्या सुमारास उत्तर-पश्चिम दिशेकडून गोळीबाराचा आवाज आला. त्यानंतर पहाटे 02:20 च्या सुमारास डम्पी हिल भागातील अज्ञात सशस्त्र हल्लेखोर, संशयित कुकी बंडखोरांनी तेथे तैनात असलेल्या सुरक्षा कमांडोच्या दिशेने गोळीबार सुरू केला. कमांडोनी याला प्रत्युत्तर दिल्यानंतर पहाटेपर्यंत सुरक्षा जवान आणि जमावामध्ये संघर्ष सुरू होता. या संघर्षादरम्यान खोईनुमंतबी चिंगथक येथील बंकरमध्ये आश्रय घेत असलेल्या मैतेई समुदायाच्या लोकांना कुकी जमावाच्या गोळीबाराला सामोरे जावे लागले. गोळीबाराच्या घटनेनंतर तीन मैतेई स्वयंसेवक मृतावस्थेत आढळले. सध्या परिस्थिती नियंत्रणात आणण्यात सुरक्षा दलांना यश आले असले तरी कोणत्याही वेळी जमावाकडून पुन्हा हल्ला होण्याची शक्यता नाकारता येत नाही. लष्कर, पोलीस आणि अन्य सुरक्षा दलांनी व्यापक शोधमोहीम सुरू केली आहे.
हिंसाचारामागे विदेशी शक्ती : मुख्यमंत्री
मणिपूरमधील हिंसाचार पूर्वनियोजित असून त्याला देशाबाहेरील शक्ती जबाबदार असल्याचा दावा मुख्यमंत्री बिरेन सिंह यांनी केला आहे. हिंसाचार नियंत्रणात आल्यानंतरच निर्बंध शिथिल केले जातील, असेही त्यांनी स्पष्ट केले. सध्या राज्यात कडक सुरक्षा बंदोबस्तासह इंटरनेटवर बंदी घालण्यात आली आहे. हिंसाचार प्रभावित भागात संचारबंदीही लागू करण्यात आली आहे.









