तृणमूल समर्थक अन् भाजप नेत्याची हत्या
वृत्तसंस्था/ कोलकाता
पश्चिम बंगालमध्ये 8 जुलै रोजी होणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकीपूर्वी सातत्याने हिंसक घटना घडत आहेत. मागील 24 तासांदरम्यान अनेक भागांमध्ये गोळीबार अन् स्फोटात 3 जणांना जीव गमवावा लागला आहे. 24 परगणा येथे तृणमूल उमेदवाराच्या पित्याची हत्या करण्यात आली आहे. तर मुर्शिदाबाद जिल्ह्यात काँग्रेस कार्यकर्त्यावर गोळ्या झाडण्यात आल्या. 24 परगणा येथेच क्रूड बॉम्ब स्फोटात एका व्यक्तीचा मृत्यू झाला. तर पुरुलिया येथे भाजप नेत्याचा मृतदेह आढळून आला आहे.
उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाल्यापासून (9 जूनपासून) आतापर्यंत हिंसेत 10 जण मारले गेले आहेत. 52 वर्षीय तृणमूल कार्यकर्ते जियारुल मोल्ला यांची फुलमलंचा येथे गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे. जियारुल हे कथलबेरिया ग्रामपंचायत निवडणुकीतील तृणमूल उमेदवाराचे वडिल होते अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
पोलिसांना सोमवारी पुरुलिया जिल्ह्यातील बोडो भागात भाजप नेते बंकिम हांसदा यांचा मृतदेह आढळला आहे. तर मुर्शिदाबाद जिल्ह्dयातील समसेरगंजमध्ये रविवारी रात्री काँग्रेस कार्यकर्ते आरिफ शेखवर गोळ्या झाडण्यात आल्या. आरिफ हा गंभीर जखमी असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. या घटनेनंतर काँग्रेस कार्यकर्त्यांनी समसेरगंज येथील रस्sतवाहतूक रोखून धरत निदर्शने केली. या गोळीबारामागे तृणमूल काँग्रेसचा हात असल्याचा आरोप काँग्रेसकडून करण्यात आला आहे.
क्रूड बॉम्ब तयार करताना स्फोट
उत्तर 24 परगणा जिल्ह्यातील हरोआ भागात रविवारी रात्री क्रूड बॉम्ब तयार करताना स्फोट झाला. यात एकाचा मृत्यू झाला असून दुसरा व्यक्ती गंभीर जखमी झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. राज्यात ग्रामपंचायत निवडणुकीकरता केंद्रीय सुरक्षा दलांच्या 822 तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. राज्य निवडणूक आयोगाने पेंद्रीय गृह मंत्रालयाला पत्र लिहून या तुकड्यांची मागणी केली होती.









