विरोधी पक्षांच्या नव्या युतीविरोधात तक्रार सादर
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
नुकत्याच बेंगळूर येथे पार पडलेल्या 26 विरोधी पक्षांच्या बैठकीत त्यांच्या युतीचे नवे नाव घोषित करण्यात आले आहे. हे नाव ‘इंडियन नॅशनल डेव्हलपमेंटल इन्क्ल्यूझिव्ह अलायन्स’ किंवा आयएनडीआयए म्हणजेच उच्चारी ‘इंडिया’ असे ठेवण्यात आले आहे. मात्र, हे नाव कायद्याच्या कचाट्यात सापडण्याची शक्यता आहे. या नावाविरोधात दिल्लीत तक्रार सादर झाली आहे.
‘इंडिया’ या नावामुळे भारताच्या प्रतीक अधिनियमाचा किंवा एम्ब्लेम अॅक्टचा भंग होत आहे, असे या तक्रारीत स्पष्ट करण्यात आले आहे. ही तक्रार दिल्लीतील अवनीश मिश्रा या विधीतज्ञाने सादर केली आहे. कोणालाही आपल्या राजकीय किंवा व्यक्तिगत लाभासाठी इंडिया किंवा भारत या विशेषनामाचा उपयोग करु शकत नाही, असे या कायद्याच्या अनुच्छेद 3 मध्ये स्पष्ट केलेले आहे.
प्रतीक कायद्याच्या अनुच्छेद 5 मध्ये इंडिया किंवा भारत या विशेषनामाचा उपयोग लाभासाठी करणे हा गुन्हा मानण्यात आला असून त्याला दंड आणि कारावासाची शिक्षा सांगण्यात आली आहे. या 26 पक्षांनी हा गुन्हा एकत्रितरित्या केलेला असल्याने त्यांच्या नेत्यांना शिक्षा करण्यात यावी, तसेच या नावाचा उपयोग करण्याचा अधिकार त्यांना मिळू नये, असे तक्रारदाराने स्पष्ट केले आहे. भारताचा राष्ट्रध्वजही या कायद्यानुसार संरक्षित करण्यात आलेला असून तो जसा आहे त्याच स्वरुपात त्याचा उपयोग कोणतीही खासगी व्यक्ती किंवा संस्था स्वत:चे व्यवसाय किंवा लाभासाठी करु शकत नाही. तसे केल्यास तो गुन्हा ठरतो, असे मत अनेक कायदेतज्ञांनी व्यक्त केलेले आहे. परिणामी हे नावही वादाच्या भोवऱ्यात सापडण्याची दाट शक्यता आता स्पष्टपणे दिसून येत आहे.
हेतुपुरस्सर हेच नाव
या 26 पक्षांच्या युतीने आपले पूर्वीचे संयुक्त पुरोगामी आघाडी हे नाव बदलून नवे ‘इंडिया’ हे नाव धारण केले आहे. इंडिया या नावाचा राजकीय लाभ उठविण्याचाच हा हेतुपुरस्सर केलेला प्रयत्न आहे. हे बेकायदेशीर कृत्य असून हा उघडपणे प्रतीक अधिनियमाचा भंग आहे, असेही तक्रारीत नमूद करण्यात आले असून आता यावर कोणती कृती केली जाते याकडे औत्सुक्याने पाहिले जात आहे. काही विधीतज्ञांनीही त्यांची मते यावर व्यक्त केली असून आता हे प्रकरण उच्च न्यायालये किंवा सर्वोच्च न्यायालयातही जाईल, अशी शक्यता त्यांनी व्यक्त केली. त्यामुळे हे नव्या नावाचे प्रकरण गाजण्याची शक्यता आहे.









