वणव्याला आळा घालण्यासाठी दहा ड्रोनची खरेदी होणार : जंगलातील आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी नवीन तंत्रज्ञान वापरात येणार
पणजी : राज्यातील जंगले व वन्यजीव सुरक्षित रहावीत, यासाठी वनखाते सजग आहे. तरीही काहीजण वनकायद्याचे उल्लंघन करून नको त्या गोष्टी करीत असतात. अशांवर आळा घालण्यासाठी आता वनखाते बारीक लक्ष ठेवून असून, वन कायद्याचे उल्लंघन झाल्यास ते कदापिही खपवून घेतले जाणार नाही. तसेच राज्यातील वन्यजीव अभयारण्ये आणि संरक्षित क्षेत्रांच्या निरीक्षणासाठी वनखाते 8 ते 10 ड्रोन खरेदी करणार आहे, अशी माहिती वनमंत्री विश्वजित राणे यांनी दिली. वनखात्याच्या सभागृहात घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी वनअधिकारी सौरभ कुमार व इतर उपस्थित होते. वन कायद्यांचे उल्लंघन थांबविण्याबरोबरच अनुचित प्रकार रोखण्यासाठी आणि निरीक्षणासाठी वनखात्याकडून 8 ते 10 ड्रोन खरेदी करण्याची तयारी सुरू करण्यात आली आहे. गेल्या वर्षी वनक्षेत्रात लागलेल्या वणव्यात 76.5 हेक्टर जंगल नष्ट झाले होते. त्यादृष्टीने खबरदारीचा उपाय म्हणून जंगलातील आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी तसेच वन्यजीव अभयारण्ये आणि संरक्षित क्षेत्रांवर लक्ष ठेवण्यासाठी नवीन तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार असल्याची माहिती आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी दिली. राणे यांनी सांगितले की, गतवर्षी ज्या ज्या ठिकाणी वणवा लागून झाडे नष्ट झालीत, अशा ठिकाणी वनखात्याने पावसाळा सुरू होण्यापूर्वी त्या ठिकाणी रोपे लावली आहेत. ही रोपे जगविण्यासाठी वनखाते त्यांची वेळोवेळी काळजी घेत आहे. यापुढे वनव्याप्त भागात आग लागल्यास आगीचे रीअल टाइम मॉनिटरींग करण्यासाठी फॉरेस्ट सर्व्हे ऑफ इंडिया (एफएसआय) ची वेब मॅप सर्व्हिस (डब्ल्यूएमएस) आणि वेब फीचर सर्व्हिस (डब्ल्यूएफएस) यांचीही मदत घेतली जाणार आहे. कारण फॉरेस्ट सर्व्हे ऑफ इंडिया ही जंगलात लागलेल्या आगीचे रीअल-टाइम मॉनिटरिंग प्रदान करते. यांचीही मदत राज्य वन विभागांकडून घेण्यात येणार असल्याचे ते म्हणाले.
600 ट्रॅकर्स करणार वनखात्याला मदत
आग आणि इतर वन्यजीव आपत्कालीन परिस्थितीत मदत करण्यासाठी 600 ट्रॅकर्सना नियुक्त करण्यात येणार आहे. या ट्रॅकर्सना 31 डिसेंबरपूर्वी प्रशिक्षण देण्याचे काम वनविभाग करणार आहे. याबाबत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याशीही चर्चा झाली आहे. येत्या नवीन वर्षात हे ट्रॅकर्स वनक्षेत्रात आग व वन्यजीव आपत्कालीन परिस्थितीत प्रत्यक्ष कार्याला सुरुवात करतील, अशी माहिती वनमंत्री राणे यांनी दिली.
तरुण भारतच्या वृत्ताची दखल
‘आगीच्या घटनांची पुनरावृत्ती होऊ नये’ या शीर्षकाखाली तसेच अशी घटना घडू नये यासाठी सरकारने आग दक्षता समिती नेमावी, याबाबतचे वृत्त तरुण भारतमध्ये वृत्त प्रसिद्ध होताच वनमंत्री राणे यांनी दखल घेऊन आज वनखात्याच्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन विविध मुद्यांवर चर्चा केली. जंगलातील वणवा आणि वन्यजीव आपत्कालीन परिस्थितीत कोणती काळजी घेता येईल, यावर मंत्री राणे यांनी अधिकारी व तज्ञांशी विचारविनिमय केले. या बैठकीत आपत्ती व्यवस्थापन समिती व वनखाते यांनी सामूहिक प्रयत्न करण्याची गरज असल्याचे बैठकीत बहुतांश अधिकाऱ्यांनी सांगितले.