छत्तीसगडमधील हिंदी साहित्यिकाचा पहिल्यांदाचा गौरव
वृत्तसंस्था/ रायपूर, नवी दिल्ली
प्रसिद्ध हिंदी लेखक विनोद कुमार शुक्ला यांना भारतातील सर्वोच्च साहित्यिक सन्मान असलेल्या 59 व्या ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. रोख 11 लाख रुपये, सरस्वतीची कांस्य प्रतिमा आणि प्रशस्तीपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे. 88 वर्षीय शुक्ला हे ज्ञानपीठ हा प्रतिष्ठित पुरस्कार मिळविणारे छत्तीसगडमधील पहिले लेखक ठरले आहेत. त्यांच्या लघुकथा, कविता आणि शोधनिबंध प्रसिद्ध आहेत. त्यांना हिंदीतील सर्वोत्तम समकालीन लेखकांपैकी एक मानले जाते.
प्रतिभा रे यांच्या अध्यक्षतेखालील ज्ञानपीठ निवड समितीने शनिवारी ज्ञानपीठ पुरस्कार विजेत्या साहित्यिकाच्या नावाची घोषणा केली. हिंदी साहित्य, सर्जनशीलता आणि अद्वितीय लेखनशैलीतील उत्कृष्ट योगदानासाठी विनोद कुमार शुक्ला यांना हा सन्मान देण्यात येत असल्याचे निवड समितीने स्पष्ट केले. निवड समितीमध्ये माधव कौशिक, दामोदर मौझो, प्रभा वर्मा, अनामिका, ए. कृष्णा राव, प्रफुल्ल शिलेदार, जानकी प्रसाद शर्मा आणि ज्ञानपीठचे संचालक मधुसूदन आनंद यांचा समावेश होता.
शुक्ला यांचे साहित्यिक योगदान
शुक्ला यांचे लिखाण अद्वितीय भाषाशैली आणि भावनिक मांडणीसाठी प्रसिद्ध आहे. 1999 मध्ये त्यांना ‘देअर वॉज अ विंडो इन द वॉल’ या पुस्तकासाठी साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला होता. त्यांच्या ‘नौकर की कमीज’ (1979) या साहित्यकृतीचे मणि कौल यांनी चित्रपटात रुपांतर केले होते. ‘सब कुछ होना बच्चा रहेगा’ (1992) हा त्यांचा कवितासंग्रहही बराच प्रसिद्ध आहे.
मुख्यमंत्र्यांनी ट्विट करून केले अभिनंदन
लेखक विनोद शुक्ला यांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळाल्याबद्दल मुख्यमंत्री विष्णुदेव साय यांनी आपल्या ‘एक्स’ अकाउंटवर त्यांचे अभिनंदन केले. देशातील प्रसिद्ध कादंबरीकार-कवी, आदरणीय विनोद कुमार शुक्ला जी यांना प्रतिष्ठित ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित करण्यात आल्याची बातमी मिळाली आहे. छत्तीसगडसाठी ही अभिमानाची गोष्ट आहे. आदरणीय शुक्लाजींचे हार्दिक अभिनंदन. त्यांनी छत्तीसगडला भारताच्या साहित्यिक क्षेत्रात अभिमान बाळगण्याची संधी दिली आहे. शुक्ला जी यांना दीर्घायुष्य आणि निरोगी आयुष्यासाठी शुभेच्छा’ असे ट्विट त्यांनी केले.









