सावळज :
तासगाव तालुक्यातील पूर्व भागातील अनेक गावांत सध्या द्राक्षघडांना सनबर्निंग प्रादुर्भाव वाढू लागला आहे. वाढत्या उन्हाच्या तीव्रतेने घडमनी करपुन द्राक्षमालाला फटका बसू लागला आहे. त्यामुळे द्राक्ष बागेत सावली करण्यासाठी शेतकऱ्यांनी द्राक्ष बागेवर जुन्या साड्या व शेडनेटचे आच्छादन केले आहे. मात्र या आच्छादनामुळे उत्पादन खर्चात वाढ झाली आहे.
सध्या थंडी कमी होऊन उन्हाची तीव्रता वाढू लागली आहे. मात्र अनेक ठिकाणी द्राक्षवेलींच्या काड्यांना पानाची संख्या कमी आहे. अशा ठिकाणी सावली कमी असल्याने अनेक द्राक्षबागेतील घडावर सरळ सूर्यकिरण पडतात. त्यामुळे उन्हाच्या तीव्रतेने सननिगचा प्रादुर्भाव होत आहे. ज्या बागेत वेलींच्या पानांचे व्यवस्थापन न झाल्याने सावली अभावी सनबर्निंगच्या समस्येने द्राक्षमालाला फटका बसू लागला आहे.
द्राक्षबागेचे पीक छाटण्यानंतर सुमारे ६५ ते ८५ दिवसांपर्यंतच्या कालावधीत द्राक्षपिकात सनबर्निंगची समस्या निर्माण होते. या सनबर्निंगवर कोणतेही प्रभावी औषध उपलब्ध नसल्याचे दिसून येते. त्यामुळे तापमान वाढीचा व सरळ सूर्य किरणांचा फटका द्राक्षमालाला बसत आहे. त्यामुळे उन्हापासून बचाव करण्यासाठी घडांना सावली करणे महत्वाचे आहे. बागेतील द्राक्षघडांचे वाढत्या उन्हापासून संरक्षण करण्यासाठी अनेक ठिकाणी जुन्या साड्यांचा व शेडनेटचा वापर केला जात आहे.
द्राक्षबागेत सावलीसाठी सुमारे १५ ते २० रूपयांना मिळणाऱ्या जुन्या साड्यांचा वापर केला जातो. बाजारातून साडी विकत घेऊन ती बागेवर घातली जाते मात्र उन्हामुळे साड्याही लवकर खराब होतात. हजारो रूपये खर्च ही येतो. त्यामुळे शेतकरी शेडनेटचा वापर करतात. शेडनेटसाठी सुमारे २५ ते ३० हजार रुपये खर्च येतो. द्राक्षमालाचे सनबर्निंगमुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी साड्या व शेडनेटचा द्राक्षघडांसाठी सावली निर्माण केली जात आहे. सनबनिगमुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी आच्छादन उपयुक्त आहे.








