वृत्तसंस्था / चंदीगढ
भारतीय कुस्ती संघटनेचे माजी अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंग यांच्या विरोधात आंदोलन केलेली महिला कुस्तीपटू विनेश फोगट हिला काँग्रेसने हरिणाच्या विधानसभा निवडणुकीत जुलाना मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे. तिच्या विरोधात भारतीय जनता पक्षाने कॅप्टन योगेश बैरागी यांना संग्रामात आणण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे या मतदारसंघात विनेश विरुद्ध योगेश असा संघर्ष पहावयास मिळणार आहे. भारतीय जनता पक्षाने मंगळवारी उमेदवारांची दुसरी सूची घोषित केली आहे. योगेश बैरागी हे भारतीय जनता युवा मोर्चाचे उपाध्यक्ष असून ते पक्षाच्या क्रिडा विभागाच्या हरियाणा शाखेचे सहआयोजकही आहेत.
भारतीय जनता पक्षाच्या दुसऱ्या सूचीत माजी मंत्र्यांचा समावेश आहे. क्रिशन कुमार बेदी आणि मनीष ग्रोव्हर या माजी मंत्र्यांना अनुक्रमे नरवाना आणि रोहटक मतदारसंघांमधून उमेदवारी घोषित करण्यात आली. तसेच मुख्यमंत्री नायाबसिंग सैनी यांच्या जवळचे मानले गेलेले पवन सैनी यांना नारायणगढ मतदारसंघातून, तर आसंध मतदारसंघातून योगेंदर राणा, देवेंदर कौशिक यांना गणौर मतदारसंघातून, कृष्णा गहलावत यांना राई मतदारसंघातून, प्रदीप संगवान यांना बारोडा मतदारसंघातून, ओम प्रकाश यादव यांना नरनौल मतदारसंघातून, कृष्णकुमार यांना बावर (आरक्षित) मतदारसंघातून, बिमला चौधरी यांना पटौदी (आरक्षित) मतदारसंघातून, नसीम अहमद यांना फिरोजपूर मतदारसंघातून, इझीझ खान यांना पुनहानामधून, संजय सिंग यांना नूह मतदारसंघातून मनोज रावत यांना हाथीन मतदारसंघातून, हरिंदर सिंग रामरत्तन यांना होडाल (आरक्षित) मतदारसंघातून, तर धनेश अदलाखा यांना बडखाल मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे.
5 ऑक्टोबरला मतदान
हरियाणाच्या सर्व 90 मतदारसंघांसाठी येत्या 5 ऑक्टोबरला मतदान होणार आहे. तर मतगणना 8 ऑक्टोबरला केली जाणार आहे. भारतीय जनता पक्षाने 4 सप्टेंबरला 67 उमेदवारांची प्रथम सूची घोषित केली होती. हरियाणाचे विद्यामान मुख्यमंत्री नायाबसिंग सैनी यांना लाडवा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे. हा पक्ष कोणाशीही युती न करता या निवडणुकीत संग्राम करीत आहे.









