पदकही हुकले, भारताला मोठा धक्का
वृत्तसंस्था/ पॅरिस
भारतीय कुस्तीपटू विनेश फोगाटने ऑलिम्पिकमधील स्पर्धेच्या अंतिम फेरीतील अपात्रतेविऊद्ध केलेले अपील क्रीडा लवादाच्या अस्थायी विभागाने फेटाळले आहे, असे भारतीय ऑलिम्पिक संघटनेने बुधवारी स्पष्ट केले. या निर्णयाविरुद्ध दाद मागताना विनेशने आपल्याला रौप्यपदक संयुक्तपणे बहाल करण्यात यावे, अशी मागणी केली होती. पण तिच्या पदक मिळण्याच्या आशेवर पाणी पडले आहे. मंगळवारी या अपिलावरील निर्णय दुसऱ्यांदा पुढे ढकलण्यात आला होता. दरम्यान, विनेशला आता रिकाम्या हातीच भारतात परतावे लागणार आहे.
गेल्या आठवड्यात महिलांच्या 50 किलो फ्रीस्टाइल कुस्तीच्या फायनलच्या सकाळी वजनाच्या वेळी निर्धारित मर्यादेपेक्षा 100 ग्रॅम जास्त वजनामुळे विनेशला अपात्र ठरवण्यात आले होते. युनायटेड वर्ल्ड रेसलिंग आणि आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या विरोधात कुस्तीपटू विनेश फोगाटने केलेला अर्ज फेटाळण्याच्या निर्णयाने धक्का बसला असल्याचे सांगताना भारतीय ऑलिम्पिक समितीच्या अध्यक्षा पी. टी. उषा यांनी एका निवेदनात निराशा व्यक्त केली आहे. हा निर्णय एकंदरित क्रीडा समुदायावर आणि खास करून विनेशवर लक्षणीय परिणाम करेल, असे भारतीय ऑलिम्पिक समितीने म्हटले आहे. विनेशचे अपील फेटाळल्याने पॅरिस ऑलिम्पिकमधील भारताची पदकसंख्या सहाच राहील, ज्यात एक रौप्य आणि पाच कांस्यपदकांचा समावेश आहे.
विनेशने मंगळवारी 6 ऑगस्ट रोजी 50 किलो वजनी गटात सलग 3 सामने जिंकून अंतिम फेरीत धडक मारली. विनेश ऑलिम्पिक स्पर्धेत कुस्तीच्या अंतिम फेरीत पोहचणारी पहिला महिला ठरली. विनेशने प्री क्ववार्टर फायनल सामन्यात टोकियो ऑलिम्पिक चॅम्पियन यूई सुसाकीचा पराभव केला. त्यानंतर क्वार्टर फायनलमध्ये युक्रेनच्या ओक्साना लिवाचचा धुव्वा उडवत उपांत्य फेरीत धडक दिली. तर सेमी फायनलमध्ये विनेशने क्यूबाच्या गुजमॅनवर विजय मिळवत अंतिम फेरीत प्रवेश केला. विनेशने यासह भारतासाठी रौप्य पदक निश्चित केले. आता तिच्याकडून सुवर्ण पदकाची आशा होती. मात्र नियतीला ते मान्य नव्हते. विनेशचा अंतिम फेरीतील सामना हा 7 ऑगस्ट रोजी यूएसएच्या एन सारा हिल्डब्रंटशी होणार होता. मात्र त्याआधी विनेशचे वजन 100 ग्रॅम जास्त असल्याचं निदर्शनात आले व तिला फायनलसाठी अपात्र ठरवण्यात आले.
क्रीडा लवादात लढा तरीही अपयश
यानंतर दोनच दिवसांनी विनेशने सीएएस अर्थात कोर्ट ऑफ आर्बिट्रेशन फॉर स्पोर्टसमध्ये धाव घेतली. सीएएसने विनेशची तिला अंतिम सामन्यात खेळू देण्याची मागणी फेटाळली. यामुळे विनेशने आपल्याला संयुक्तरित्या रौप्य पदक विजेता घोषित करण्यात यावे, अशी मागणी केली. त्यानंतर 9 ऑगस्ट रोजी या प्रकरणी तब्बल 3 तास युक्तीवाद चालला. विनेशकडून ज्येष्ठ वकील हरीश साळवे आणि विदुष्पत सिंघानिया या दोघांनी युक्तिवाद केला. तर विनेशने व्हिसीद्वारे आपली बाजू मांडली. तर ऑस्ट्रेलियाच्या डॉ एनाबेल बेनेट या प्रकरणात मध्यस्थाच्या (आर्बिट्रेटर) भूमिकेत होत्या. त्यानंतर क्रीडा लवादाने निर्णय 3 वेळा राखून ठेवला. या प्रकरणात 16 ऑगस्ट रोजी भारतीय वेळेनुसार रात्री 9 वाजून 30 मिनिटांनी निर्णय अपेक्षित होता. मात्र त्याआधीच कुणाच्या ध्यानीमनी नसताना स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला असा निर्णय आला. यामुळे विनेशच्या आणि पर्यायाने भारतीयांच्या पदरी निराशाच पडली आहे.









