हरियाणा विधानसभा निवडणुकीच्या धामधुमीत काँग्रेसमध्ये प्रवेश
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
कुस्तीपटू विनेश फोगट हिने काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. ती या पक्षाच्या वतीने हरियाणा विधानसभा निवडणुकीतही समभागी होणार आहे. शुक्रवारी तिने काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या उपस्थितीत येथे काँग्रेस पक्षात प्रवेश घेतला. त्यानंतर तिने भारतीय जनता पक्षावर टीकाही केली. कुस्तीपटू बजरंग पुनिया यानेही फोगटसह काँग्रेस पक्षाचे सदस्यत्व स्वीकारले आहे.
भारतीय कुस्ती संघटनेचे माजी अध्यक्ष आणि भारतीय जनता पक्षाचे माजी खासदार ब्रिजभूषण शरण सिंग यांच्या कार्यकाळात काही कुस्तीपटूंनी आंदोलन केले होते. त्यावेळी भारतीय जनता पक्षाने कुस्तीपटूंना पाठिंबा न देता त्यांच्यावर अन्याय करणाऱ्यांना पाठीशी घातले होते. जेव्हा कुस्तीपटूंचा अवमान होत होता, तेव्हा काँग्रेस पक्ष त्यांच्याबाजूने उभा राहिला, असे प्रतिपादन तिने केले.
अफवा पसरविल्याचा आरोप
कुस्तीपटू आंदोलन करीत असताना भारतीय जनता पक्षाने त्यांच्या विरोधात अफवा पसरविण्याचे काम केले होते. कुस्तीपटूंचे करिअर संपले आहे. ते आता कुस्ती खेळू इच्छित नाहीत, असा समज पसरविण्याचे काम झाले होते. तथापि, आम्ही राष्ट्रीय स्पर्धा आणि ऑलिंपिकही खेळलो. काँग्रेस पक्षच महिलांचा खरा पाठीराखा राजकीय पक्ष आहे, असे प्रतिपादन विनेश फोगट हिने केले.
पुनियाचाही आरोप
कुस्तीपटू बजरंग पुनियानेही काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. आंदोलनकर्त्या कुस्तीपटूंनी सर्व पक्षांच्या महिला खासदारांना भेटीसाठी आमंत्रित केले होते. पण भारतीय जनता पक्षाने या आमंत्रणाला प्रतिसाद दिला नाही. ते आपल्या बहिणींसमवेत राहिले नाहीत. त्यांनी आमच्यावर अन्याय करणाऱ्यांची बाजू घेतली. असा आरोप पुनिया यानेही भारतीय जनता पक्षावर केला आहे.
अपात्रतेवर मात्र आरोप नाही
नुकत्याच झालेल्या ऑलिंपिक स्पर्धेत फोगटला वजन अधिक भरल्याने अंतिम फेरीत अपात्र ठरविण्यात आले होते. त्यासंबंधी मात्र तिने कोणावरही कसलाही आरोप केला नाही. कदाचित देवाच्या मनात वेगळीच योजना असावी, अशी टिप्पणी तिने या संबंधी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला अनुसरून केली.









