ग्लोब थिएटरसमोरील वीजवाहिन्या ठरल्या धोकादायक
बेळगाव : मान्सून सुरू होण्यास अवघे काही दिवस शिल्लक राहिले असतानाही अद्याप शहरातील वीज वाहिन्यांची दुरुस्ती पूर्ण झालेली नाही. दरवर्षी मे महिन्याच्या पहिल्या अथवा दुसऱ्या आठवड्यात वीज वाहिन्यांची दुरुस्ती करून धोकादायक ठिकाणांची माहिती जमविली जाते. परंतु यावर्षी अद्याप तशा पद्धतीने काम सुरू झाल्याचे दिसत नाही. पावसाळ्याच्या दिवसात धोकादायक झाडांच्या फांद्या अथवा वृक्ष कोसळून वीजपुरवठा ठप्प होतो. तसेच काही ठिकाणी वेली विद्युत वाहिन्यांवर पसरल्याने वाहिन्यांचा एकमेकाला स्पर्श होऊन शॉर्ट सर्किट होण्याचा धोका संभवतो. त्यामुळे पावसाला सुरुवात होण्यापूर्वी हेस्कॉमकडून दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येते. यावर्षी अद्याप शहराच्या मध्यवर्ती भागातील दुरुस्तीच्या कामाला सुरुवात झाली नसल्याचे दिसून येत आहे. ग्लोब थिएटरसमोरील वीज वाहिन्यांवर वेलींचे आच्छादन पसरले आहे. यामुळे पावसाळ्याच्या दिवसात धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. हेस्कॉमकडून दरवर्षी शहरातील धोकादायक ठिकाणांचा सर्वेक्षण करून दुरुस्ती केली जाते. परंतु यावर्षी अद्याप दुरुस्तीचे काम सुरू नसल्याने शहरवासियांतून नाराजी व्यक्त होत आहे.









