शाळा संच मान्यतेने कोकणातील शैक्षणिक क्षेत्रावर वरवंटा, शेकडो शाळा, शिक्षकांना फटका
चिपळूण : 15 मार्च 2024 च्या शाळा नवीन संचमान्यता शासन निर्णयामुळे कोकणातील तीनही जिल्ह्यातील शैक्षणिक क्षेत्रावर वरंवटा फिरवला जात आहे. या निर्णयामुळे शेकडो शाळा, शिक्षकांना याचा फटका बसणार असून विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात येणार आहे. त्यामुळे सर्वांच्याच दृष्टीने अन्यायकारक निर्णय घेणाऱ्या सरकारचे डोके ठिकाणावर आहे का, असा सवाल माजी खासदार, ठाकरे शिवसेनेचे नेते विनायक राऊत यांनी सोमवारी येथे पत्रकार परिषदेत सरकारला विचारला. त्याचबरोबर रत्नागिरी, सिंधुदुर्गचे पालकमंत्री याकडे दुर्लक्ष करीत निद्रावस्थेत असल्याची टीकाही केली आहे.
ते पुढे म्हणाले, घटनेने मोफत शिक्षणाचा अधिकार सर्वांना दिलेला असतानाच दुदैवाने तो अधिकार आजला सरकार नष्ट करण्याचा प्रयत्न करत आहे. नवीन संच मान्यतेमुळे कोकणात शिक्षणाचा पुरता बट्ट्याबोळ होणार आहे. विधानसभा निवडणुकीत पाशवी बहुमत मिळाल्यानंतर सीबीएसई पॅटर्न, हिंदी सक्ती, इंग्रजीची भरभराट असे वेगवेगळे निर्णय घेणाऱ्या या सरकारने संच मान्यता निर्णय राज्यात इतरत्र विभागात न घेता केवळ कोकणातच घेतला आहे.
येथील शाळा बंद करून त्या खासगी शिक्षण सम्राटांच्या घशात घालण्याचा प्रयत्न चालवला असल्याचा आरोपही राऊत यांनी केला आहे. या निर्णयामुळे एकट्या रत्नागिरी जिल्ह्यात 550 प्राथमिक, 428 माध्यमिक असे मिळून 978, तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात 676 शिक्षक अतिरिक्त होणार आहेत. त्यातील काहींना समायोजन करुन घेता येणार असले तरी शाळा बंदची नामुष्की ओढवणार आहे. दोन्ही जिल्ह्यातील शैक्षणिक क्षेत्रात मोठी उलथापालथ होत असताना दोन्ही पालकमंत्री मात्र निद्रावस्थेत आहेत. त्यांचे जिल्ह्याहकडे लक्ष आहे का? त्यांनाही शाळा बंद पाडायच्या आहेत का, असे सवालही केले.
यापूर्वी या जिल्हयांना डोंगरीच्या सवलती मिळत होत्या. मात्र हा निर्णय घेताना त्याकडेही दुर्लक्ष केले गेले. कोकणातील विद्यार्थी हुशार आहेत, हे प्रत्येक निकालावेळी स्पष्ट होते. त्यामुळे आम्हाला डोंगरी जिल्हा म्हणून विशेष काही देऊ नका, आहेत त्या सवलती कायम ठेवा. तसेच संच मान्यतेचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तत्काळ रद्द करावा, पूर्वीप्रमाणेच डोंगरी सवलती लागू कराव्यात, अशा मागण्याही राऊत यांनी करताना आम्ही शिक्षण वाचवा अभियान सुरु करणार असल्याचेही शेवटी सांगितले. यावेळी ठाकरे शिवसेनेचे विधानसभा क्षेत्रप्रमुख बाळा कदम, जिल्हा संघटक संतोष थेराडे, सुधीर शिंदे, भैय्या कदम, पार्थ जागृष्टे, विकी नरळकर आदी उपस्थित होते.
शहरप्रमुख नियुक्ती लवकरच
चिपळूण शहरप्रमुख पदासाठी चार–पाच पदाधिकारी इच्छुक असून त्यांची नावे पुढे आली आहेत. लवकरच सर्वांशी चर्चा करुन शहर प्रमुखपदाची नियुक्ती केली जाईल, असे उत्तर राऊत यांनी दिले. पहलगाम येथील दहशतवादी हल्ला हे सरकारचे अपयश असून त्याला गृहमंत्री अमित शाह जबाबदार आहेत. देशातील लोकभावना लक्षात घेऊन पाकिस्तानच्या हद्दीत जाऊन त्याला धडा शिकवण्याची गरज असून त्यासाठी आम्ही सरकारसोबत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.








