बेळगाव : कंग्राळ गल्ली येथील केजीबी स्पोर्ट्स क्लब आयोजित 44 व्या श्री गणेश सिंगल विकेट क्रिकेट स्पर्धेत विनायक निळकंठाचेने विजेतेपद तर नारायण कणबरकरला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. संतोष सुळगे पाटील याला अष्टपैलू खेळाडू म्हणून गौरविण्यात आले. सरदार मैदानावर घेण्यात आलेल्या श्री गणेश सिंगल विकेट क्रिकेट स्पर्धेत जवळपास 64 खेळाडूंनी सहभाग घेतला होता. प्रथमच ही स्पर्धा प्रकाशझोतात घेण्यात आली. स्पर्धेतील पहिला उपांत्य फेरीचा सामना मनोज ताशिलदार व विनायक निळकंठाचे यांच्यात झाला. या सामन्यात विनायक निळकंठाचे याने विजय संपादन करीत तर दुसऱ्या उपांत्य फेरीच्या सामन्यात नारायण कणबरकरने परशराम बडवाणाचे याचा पराभव करुन अंतिम फेरीत प्रवेश केला. अंतिम सामन्यात मात्र विनायक निळकंठाचेने नारायण कणबरकरचा पराभव करुन 44 वा श्री गणेश चषक पटकाविला.
स्पर्धेनंतर बक्षीस वितरण प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून एसीपी नारायण बरमनी, दीपक पवार, शरद पाटील, शंकर बडवाण्णाचे, बाबूराव कुट्रे, अरुण पठाणे आदी मान्यवरांच्या हस्ते विजेत्या व उपविजेत्या खेळाडूंना चषक, प्रमाणपत्र व रोख रक्कम देऊन गौरविण्यात आले. स्पर्धेतील उत्कृष्ट फलंदाज परशराम बडवाण्णाचे, उत्कृष्ट गोलंदाज मनोज ताशिलदार, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक रोहित मुरकुटे, उत्कृष्ट क्रिकेटर सुशांत शिंदे, उगवता क्रिकेटपटू म्हणून आर्यन इंगवले तर अष्टपैलू खेळाडू म्हणून संतोष सुळगे-पाटील यांना चषक व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. तर विजेत्या व उपविजेत्या खेळाडूंना मंगाईतर्फे बॅट पुरस्कृत करण्यात आल्या. यावेळी केजीबीच्या पदाधिकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.









