30 नोव्हेंबर 2025 पर्यंत पदाची जबाबदारी सांभाळणार
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
केंद्र सरकारने स्टेट बँक ऑफ इंडिया (एसबीआय) चे व्यवस्थापकीय संचालक (एमडी) म्हणून विनय एम. टोन्से यांची नियुक्ती केली आहे. एका अहवालात ही माहिती दिली आहे. अहवालानुसार, नवीन व्यवस्थापकीय संचालकांचा कार्यकाळ 30 नोव्हेंबर 2025 पर्यंत राहणार असल्याची माहिती आहे.
वित्तीय सेवा संस्था एफएसआयबी ब्युरोने 4 सप्टेंबर रोजी सांगितले होते की, त्यांनी स्टेट बँकेच्या एमडीसाठी विनय एम. टोन्से यांच्या नावाची शिफारस केली आहे. एफएसआयबीने आपल्या निवेदनात म्हटले होते की, ‘या संदर्भात 13 उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या आणि त्यांची कामगिरी, अनुभव आणि इतर बाबी लक्षात घेऊन ब्युरोने विनय एम. टोन्से यांची व्यवस्थापकीय संचालक पदावर नियुक्ती करण्याची शिफारस केली आहे.’ टोन्से हे सध्या स्टेट बँकेत उपव्यवस्थापकीय संचालक म्हणून कार्यरत आहेत.
स्वामिनाथन जानकीरामन यांना भारतीय रिझर्व्ह बँकेचे डेप्युटी गव्हर्नर बनवल्यानंतर हे पद रिक्त होते. देशातील सर्वात मोठी बँक असलेल्या एसबीआयमध्ये चार एमडी आणि एक अध्यक्ष आहेत.
दुसऱ्या तिमाहीत बँकेचा निव्वळ नफा 14,330 कोटीवर
अलीकडेच, देशातील सर्वात मोठी सार्वजनिक क्षेत्रातील बँक स्टेट बँक ऑफ इंडियाने आर्थिक वर्ष 2023-24 च्या दुसऱ्या तिमाहीचे (जुलै-सप्टेंबर) निकाल जाहीर केले होते. दुसऱ्या तिमाहीत बँकेचा निव्वळ नफा वार्षिक 8 टक्क्यांनी वाढून 14,330 कोटी रुपये झाला आहे.









