वृत्तसंस्था /नवी दिल्ली
भारताचे अमेरिकेतील राजदूतपद सांभाळण्यासाठी ज्येष्ठ सनदी अधिकारी विनय मोहन क्वात्रा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ते हा पदभार लवकरच हाती घेत आहेत. ही घोषणा भारताच्या परराष्ट्र व्यवहार विभागाने शुक्रवारी केली आहे. क्वात्रा हे तरणजित सिंग संधू यांचे स्थान स्वीकारणार आहेत. संधू काही काळापूर्वी या पदावरुन निवृत्त झाले आहेत. क्वात्रा यांना प्रशासकीय आणि विदेशव्यवहार विभागांचा तीन दशकांचा कार्यानुभव आहे. त्यांनी 2017 ते 2020 या काळात भारताचे फ्रान्समधील राजदूत म्हणून कार्य केले आहे, अशी माहिती देण्यात आली.
भारताचे राजदूत म्हणून त्यांनी नेपाळमध्येही कामकाज हाताळले आहे. भारताच्या विदेश विभागात काम करताना त्यांनी अमेरिका, चीन आणि युरोपियन देशांशी भारताच्या संबंधांविषयीचे धोरण ठरविण्यासाठी महत्त्वाचे योगदान दिले आहे. त्यांनी 2015 ते 2017 या कालावधीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमवेत त्यांच्या कार्यालयातील सहसचिव म्हणून काम केले आहे. भारताचे परराष्ट्र व्यवहार मंत्री एस. जयशंकर यांनी क्वात्रा यांची त्यांचे काम आणि धोरण निर्धारण करण्याची क्षमता यांची भलावण केली आहे. क्वात्रा यांनी भारताच्या विदेश व्यवहार विभागाचे सचिव म्हणून केलेली कामगिरी मोलाची आहे, असे जयशंकर यांनी त्यांच्या अमेरिकेच्या राजदूतपदी नियुक्तीसंबंधी केलेल्या अभिनंदन संदेशात स्पष्ट केले आहे. क्वात्रा यांनीही हे नवे उत्तरदायित्व सोपविण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि परराष्ट्र व्यवहार मंत्री एस. जयशंकर यांचे आभार मानले आहेत.









