देवदासी अन् त्यांच्या मुलांचा आधारस्तंभ, शिक्षणाच्या आधारे उद्धार : अथणी येथील वकील बी. एल. पाटील यांच्याकडून संस्थेची सुरुवात
रमेश हिरेमठ, बेळगाव
बेळगावसह उत्तर कर्नाटक व पश्चिम महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात देवदासी पद्धत जिवंत होती. देवदासी व त्यांच्या मुलांचे जगणे कठीण होते. पावलोपावली त्यांना समाजव्यवस्थेत अपमान सहन करावा लागत होता. देवदासी पद्धतीचा नायनाट करण्याबरोबरच त्यांच्या मुलांचे जगणे सुसह्या करून समाजात त्यांना स्वत:च्या पायावर उभारण्याचे बळ देण्याचे काम अथणी येथील ‘विमोचना’ या संस्थेने केले आहे. सौंदत्ती यल्लम्मा, कोकटनूर यल्लम्मा मंदिरांमुळे उत्तर कर्नाटकातील अनेक ठिकाणी वर्षानुवर्षे देवदासींची प्रथा जिवंत होती. या प्रथेवर आघात करण्यासाठी अथणी येथील बी. एल. पाटील या वकिलांनी ‘विमोचना’ संस्थेची सुरुवात केली. एम. व्ही. पाटील, रणमोडे, जोगन शंकर, संघाचे ज्येष्ठ नेते अरविंदराव देशपांडे, व्ही. एस. मनवाडे आदी ज्येष्ठ नेत्यांच्या सहकार्याने विमोचनाची स्थापना झाली. 1 सप्टेंबर 1985 रोजी देवदासींच्या पुनर्वसनासाठी सुरू झालेल्या या संस्थेच्यावतीने देशातील देवदासींच्या मुलांसाठी पहिली शाळा सुरू करण्यात आली.
मलाबाद येथे देवदासींच्या मुलांसाठी निवासी शाळा आहे. बी. एल. पाटील यांची आई शेवंताबाई पाटील यांनी तर विमोचनासाठी स्वत:चे घर दिले. 30 मुलांपासून सुरू झालेल्या या संस्थेत आजवर 30 हजारहून अधिक विद्यार्थ्यांनी शिक्षण घेतले आहे. पंधराशेहून अधिक देवदासींची मुले येथे घडली आहेत. महाराष्ट्र, कर्नाटकातील विविध ठिकाणी नोकऱ्या करत आहेत. पोलीस, महसूल खाते, आरोग्य खाते, शिक्षण खात्यात सेवा बजावत आहेत. यापैकी देवदासींची अनेक मुले वेगवेगळ्या विद्यापीठ व कॉलेजमध्ये प्राध्यापक झाली आहेत. काही जण अभियंते बनले आहेत. समाजाच्या मुख्य प्रवाहात सामावून स्वाभिमानाचे जीवन जगत आहेत.
विमोचना संस्थेच्यावतीने पूर्वप्राथमिकपासून पीयुसीपर्यंत व नर्सिंगपर्यंतचे शिक्षण देण्यात येत आहे. पुढील शिक्षणासाठी नागनूर, गदग, इळकल व सुत्तूर मठाधीशांचे साहाय्य घेतले जात आहे. मलाबाद येथील निवासी शाळेत तर संगणक व शिलाईचे प्रशिक्षणही दिले जात आहे. या संस्थेत दोन वर्षापूर्वी देवदासीच्या मुलाने बारावी पूर्ण केली. त्यानंतर आजवर एकही देवदासीचा मुलगा या संस्थेत नाही. आठशेहून अधिक सामान्य मुले विमोचना शिक्षण संस्थेत शिकत आहेत. यापैकी 200 विद्यार्थी निवासी शाळेत आहेत.
बी. एल. पाटील यांची पत्नी शांतादेवी यांनी मलाबाद येथे विमोचनासाठी आठ एकर जमीन दान केली. बसगौडा कुल्लळ्ळी यांनी दहा एकर जमीन दिली. राज्य सरकारने अथणी येथे आठ एकर जमीन मंजूर केली आहे. राज्यातील विविध मठाधीश व वेगवेगळ्या नेत्यांच्या सहकार्याने ही संस्था चालविण्यात येत आहे. बी. एल. पाटील यांनी तर बाराव्या शतकात महात्मा बसवेश्वरांनी सामाजिक समानतेसाठी केलेल्या चळवळीची प्रेरणा घेऊन व इळकल येथील महांत स्वामीजींच्या मार्गदर्शनाखाली देवदासी या अनिष्ट प्रथेवर प्रहार करण्याबरोबरच देवदासींच्या मुलांचे पुनर्वसन करण्याचे काम केले आहे. या कामासाठी कौतुकाबरोबरच त्यांच्यावर टीकाही झाली आहे.
संस्थेच्या स्थापनेपासून आजतागायत 39 वर्षांच्या कारकीर्दीत शेकडो देवदासींचे व त्यांच्या मुलांचे पुनर्वसन केले आहे. मुंबई येथे शरीरविक्रय करणाऱ्या महिलांमध्ये अथणी तालुक्यातील महिलांची संख्या अधिक होती. जोगन शंकर यांच्याकडून यासंबंधीची माहिती मिळाल्यानंतर बी. एल. पाटील अस्वस्थ झाले. आपल्यापेक्षा वयाने लहान असलेल्या जोगन शंकर यांनाच मार्गदर्शक मानून देवदासी प्रथेविरुद्ध त्यांनी सामाजिक चळवळ उभी केली. सुरुवातीला त्यांच्यावर टीका झाली. अपमान सहन करावा लागला. शरीरविक्रय करणाऱ्या महिलांचा वकील असे टोमणे मारण्यात आले. कौतुक किंवा टीका या दोन्हींचा समचित्ताने स्वीकार करून बी. एल. पाटील यांनी उत्तर कर्नाटकातील देवदासी ही अनिष्ट प्रथा दूर करण्यासाठी झटले आहेत.
देशात प्रथमच बी. एल. तथा बसवप्रभू लकमनगौडा पाटील यांनी पूर्ण प्रमाणात देवदासी प्रथेविरुद्ध चळवळ सुरू केली. यासाठी त्यांनी आपली वकिली पेशा सोडला. गावोगावी फिरून देवदासी पद्धतीच्या फेऱ्यात अडकलेल्या माता-भगिनींची भेट घेऊन त्यांना धीर दिला. त्यांना अन्न, आश्रय व औषधे देऊन त्यांचा सांभाळ केला. विमोचना संस्थेत शिक्षण घेतलेल्या देवदासींची मुले आज अनेक क्षेत्रात आहेत. डॉक्टर, इंजिनियर, सनदी अधिकारी, प्राध्यापक, परिचारिका बनली आहेत. एकाने तर केएएसची परीक्षा पूर्ण केली आहे. विमोचना संस्थेच्यावतीने अनेक शैक्षणिक, सामाजिक व आरोग्यविषयक उपक्रम चालविले जातात.
उत्तर कर्नाटकातील देवदासी पद्धती आटोक्यात
देवीच्या नावे लहान वयातच देवदासी पद्धतीसाठी मुली सोडल्या जातात. बेळगाव, विजापूर, बागलकोट, बळ्ळारी, कोप्पळ, रायचूर, गुलबर्गा, धारवाड, गदग, हावेरी आदी ठिकाणी ही प्रथा एकेकाळी मोठ्या प्रमाणात रुढ होती. गरीब व मध्यमवर्गीय, मागासवर्गीय मुलींना या अनिष्ट प्रथेसाठी जुंपण्यात येत होते. देवीच्या नावाने एकदा देवदासी बनल्यानंतर शरीरविक्रयाशिवाय उदरनिर्वाहासाठी त्यांना अन्य मार्ग रहात नाही. त्यांच्यापोटी जन्म घेणाऱ्या मुलांच्या वाट्यालाही उपेक्षेचे जगणे येते. गेल्या 35 वर्षांपासून सातत्याने केलेल्या चळवळीमुळे उत्तर कर्नाटकातील देवदासी पद्धती जवळजवळ आटोक्यात आली आहे. त्याचे श्रेय अथणी येथील विमोचना ही संस्था व या संस्थेसाठी आपले सर्वस्व पणाला लावणारे बी. एल. पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांना जाते.
ग्रामीण विकासाचे कार्यही
ग्रामीण विकासकार्यातही विमोचना संस्था मागे राहिलेली नाही. अथणी तालुक्यातील होसट्टी गावानजीक जनतेच्या सहकार्याने अघहारिणी या लहान नदीवर धरण बांधून शंभरहून अधिक लहान भिंतीही बांधल्या आहेत. याद्वारे पाण्याची बचत व मातीचे रक्षण हा संस्थेचा हेतू सफल झाला आहे. कपार्टच्या सहकार्याने ग्रामीण विकास आंदोलन व पाण्याची बचत आणि पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी अभियान सुरू केले आहे. विमोचना संस्थेला राज्य व केंद्र सरकारचे अनेक पुरस्कार लाभले आहेत. राज्य महिला- बालकल्याण खात्याचा बालकुशल विकास पुरस्कार (1991), केंद्र सरकारच्या बालकुशल विकास पुरस्कार (1997), संदेश प्रतिष्ठान पुरस्कार (1998), राज्योत्सव पुरस्कार (2001), राज्यपालांचा विशेष पुरस्कार (2002), बेंगळूरचा राममोहन लोहिया पुरस्कार (2006), उडुपी श्रीकृष्ण पुरस्कार (2007), राज्य सरकारचा राणी कित्तूर चन्नम्मा पुरस्कार, मंड्या कन्नड साहित्य परिषदेचा श्री नालवडी कृष्णराज वडेयर पुरस्कार (2009) याशिवाय काही मठ-मठाधिशांनी पुरस्कार देऊन गौरविले आहे.









