गुहागर / प्रशांत चव्हाण :
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गावांना सक्षम करण्याच्या दिशेने देशातील गावागावांमध्ये ‘भारतनेट’ प्रकल्प राबवला. या प्रकल्पाच्या पहिल्या टप्याची यशस्वी अंमलबजावणी राज्यात झाल्यानंतर याच धर्तीवर महाराष्ट्रात ‘महानेट’ हा प्रकल्प राबवला जात आहे. यामध्ये आरोग्य, शिक्षणासोबतच स्मार्ट सिंचन, ड्रोनद्वारे कीटकनाशके व खत फवारणी अशा एकूण १८ आधुनिक सेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. या उपक्रमासाठी नागपूर जिल्ह्यातील ‘सातनवरी गावा’ची निवड करण्यात आली असून राज्य शासनाच्यावतीने लवकरच प्रत्येक तालुक्यातील १० गावे स्मार्ट व इंटेलिजंट करण्यात येणार आहेत.
या उपक्रमात मोबाईल कनेक्टिव्हिटीच्या माध्यमातून विविध डिजिटल उपक्रमाबरोबरच वायफायमुळे ई गव्हर्नन्समध्ये वाढ करण्यावर भर देण्यात आला आहे. ऑनलाईन शिक्षणाचा या संकल्पनेत अंतर्भाव असल्याने विद्यार्थी गळतीत लक्षणीय घट अपेक्षित आहे. शेतातील पेरणीपासून कापणीपर्यंत तसेच बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक असलेल्या सुविधा, माहिती, पीक पद्धतीचे नियोजन आदी सर्व माहिती डॅशबोर्डवर उपलब्ध होणार असून या माहितीमुळे शेतकऱ्यांना पीक पद्धतीचे नियोजन सुलभ होणार आहे.
गावातील शेतकरी ड्रोन व सेन्सर आदींचा उपयोग करून माती परीक्षण, फवारणी, खते आदींचे योग्य नियोजन करीत शेतीचा उत्पादन खर्च कमी करून उत्पन्न वाढवू शकतील. गावातील पिण्याच्या पाण्याची गुणवत्ता सुधारल्याने गावकऱ्यांचे आरोग्य सुधारेल. टेलिमेडिसिनचा उपयोग होऊन गावातच आरोग्यविषयक सुविधा उपलब्ध होतील. तसेच प्राथमिक शिक्षणात कृत्रिम बुद्धिमत्ता व स्मार्ट शिक्षणाचा अंतर्भाव करण्यात आला आहे.
- उपक्रमांना ऊर्जितावस्था मिळावी
यापूर्वी विदर्भातीलच अमरावती जिल्ह्यातील मेळघाटातील ‘हरिसाल’ हे गाव २०१५ साली देशातील पहिले ‘डिजिटल व्हिलेज’ म्हणून मोठ्या थाटात जाहीर करण्यात आले होते. मात्र, अवघ्या दहा वर्षात या ‘डिजिटल व्हिलेज’चे स्वप्न धूसर झाले. होते. केंद्र शासनाच्या आदर्श ग्राम योजनेच्या धर्तीवर महाराष्ट्र शासनाने १० वर्षापूर्वी २०१५ मध्ये आमदार आदर्श ग्राम योजना सुरू केली होती. आमदारांनी प्रारंभी उत्साह दाखवत गावांची निवड केली होती, मात्र गेल्या ६ वर्षापासून या योजनेचा विसर पडलेला दिसत आहे. सरकारकडून अशा दूरदृष्टीच्या निर्णयाचे स्वागत होत असले तरी त्याची अंमलबजावणी सुस्पष्ट, पारदर्शक व जनसामान्यांपर्यंत पोहोचणारी झाली तरच ‘स्मार्ट’ आणि ‘इंटेलिजंट’ गाव तयार होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.








