संपुर्ण गोवा यात्रेत फोंडा, शिरोडा, मडकईतील सरपंचाशी संवाद : जीडीपीप्रमाणे गोवा आनंदी राज्यातही अग्रेसर व्हावे
प्रतिनिधी /फोंडा
भारतीय संविधानाच्या प्रस्ताविकेत ज्याप्रमाणे ‘आम्ही भारतीय लोक’ असे म्हटलेले आहे. त्यानुसार लोकशाहीत ‘जनता’ हीच सर्वोच्च असते. खरा भारत हा खेडोपाडय़ात वसलेला आहे. शहराच्या तुलनेत गोव्यातील खेडी संस्कृतीची जपणूक करण्यात अग्रेसर आहेत. ग्रामसंस्कृतीचा ठेवा अबाधित ठेवल्यास सर्वाधिक आनंदी मिजोराम राज्याप्रमाणे गोवाही आनंदी राज्याच्या यादीत (हेपीनेस इंडेक्स) निश्चितच प्रथम येणार असे प्रतिपादन राज्यपाल पी एस श्रीधरन पिल्लई यांनी केले.
फोंडा येथील राजीव कला मंदिर येथे काल मंगळवारी आयोजित केलेल्या ग्राम व खेडय़ाचे प्रतिनिधीत्व करणाऱया पंच, सरपंचाच्या मार्गदर्शन कार्यक्रमात ते बोलत होते. राजभवनाच्या सहकार्याने आयोजित केलेल्या गोवा संपुर्ण यात्रे दरम्यान ते फोंडा तालुक्यातील शिरोडा, मडकई व फोंडा भागातील पंचायत प्रतिनिधीशी गाठीभेटी घेतल्या. ग्रामदेवतांचे दर्शन व आशिर्वाद घेतले.
आनंदी राज्याच्या यादीत गोवा अग्रेसर बनविणे हेच स्वप्न- राज्यपाल
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या स्वराज्य संकल्पनेवर भर देताना राज्यपाल म्हणाले की स्वावलंबी गाव ही गांधीजीची संकल्पना होती. जी ग्रामिण पुर्नरचनेची अनोखी संकल्पना होती. ग्रामस्वराज्य संकल्पना ही ग्रामिण पुर्नरचनेच्या पर्यायी मॉडलपैकी एक मानली गेलेली आहे. ज्याचा प्राथमिक उद्देश समाजाच्या सर्वागिण विकासावर असल्याचे ते म्हणाले. प्रती भांडवल उत्पन्न (पर कॅपिटल इन्कम) यादीत गोवा देशभरातील अव्वल राज्य म्हणून गणले जाते. तसेच मिजोराम राज्य आनंदी राज्याच्या यादीत अग्रेसर आहे. वैयक्तीक पातळीवरील असणारे समाधान, चांगलं राहणीमान या यादीतून आनंदी राज्याच्या संकल्पेनतही गोवा अग्रेसर राज्य केवळ खेडय़ामुळेच होईल अशी आशा राज्यपाल श्रीधरन पिल्लई यांनी व्यक्त केली.
दहा महिन्यात 110 खेडी पादांक्रत, 350 रूग्णांना आर्थिक सहाय्य
राजीव कला मंदिर येथे राज्यपाल पी एस श्रीधरन पिल्लई यांनी उसगांव गांजे पंचायत व कुर्टी खांडेपारच्या सरपंच व पंचसदस्यांच्या गाठीभेटी घेतल्या. यावेळी त्याच्यासमवेत कृषि मंत्री रवी नाईक, राज्यपालांचे सचिव मिहीर वर्धन, जिल्हाधिकारी ज्योती कुमारी, उसगांव गांजेच्या सरपंच अस्मिता गावडे, कुर्टीचे सरपंच दादी नाईक उपस्थित होते. यावेळी मुत्रपिंड आजाराने त्रस्त डायलीसीस उपचार घेत असलेल्या रूग्णांना आर्थिक सहाय्य करण्यात आले. कालच्या यात्रेत 47 जणांना आर्थिक सहाय्य करण्यात आले. मागील दहा महिन्यापासून राज्यभरातील 110 गावांना राज्यपालांनी भेटी दिल्या असून सुमारे 350 मुत्रपिंडाच्या आजाराने त्रस्त रूग्णांना आर्थिक सहाय्य केलेले आहे. राजभवनात बसून एशोआरामात दिवस व्यथीत करणाऱयापैकी आपण नसून स्वतः मार्गदर्शक तत्वाची पर्वा न करता सामान्यात मिसळणारा आपण एक सेवक असल्याचेही त्यानी या मार्गदर्शनातून सुचित केले आहे. कृषी मंत्री रवी नाईक म्हणाले की प्रत्येक पंचायतीने आपल्या भागातील कोमुनिदाद जमिनीचा वैयक्तिक स्वार्थासाठी उपयोन न करता सामाजिक हितासाठी करा असा संदेश दिला. लोकप्रतिनिधीनी आपल्या सेवेतून जनतेची मने जिंकावी असे सांगितले व राज्यपाल पिल्लई यांच्या गोवा संपुर्ण यात्रेच्या संकल्पनेचे अभिनंदन केले.
कुर्टी खांडेपार पंचायतीच्यवतीने पंचसदस्य सातांन फर्नाडीस यांनी नवीन सुसज्ज अशा पंचायत इमारतीसाठी कोमुनिदाद जागा उपलब्ध करून देण्याबाबत राज्यापालांना निवेदन सादर केले. उसगांव पंचायतीचा आढावा पंचसदस्य रामनाथ डांगी यांनी घेतला. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन पंचायत सचिव गोकुळदास कुडाळकर यांनी केले. स्वागत व प्रास्ताविक दादी नाईक यांनी केले. अस्मिता गावडे यांनी आभार मानले.
फोंडा, शिरोडा, मडकईसह संपुर्ण फोंडा तालुका पादाक्रीत केला
राज्यपालांनी काल मंगळवारचा दिवसभर आखलेल्या कार्यक्रमात गोवा संपुर्ण यात्रे दरम्यान फोंडा तालुक्यातील मडकई येथील देवी नवदुर्गा मंदिरात आशिर्वाद घेतले. त्यानंतर यावेळी त्याच्यासमवेत वीजमंत्री सुदिन ढवळीकर, मत्सोद्योग मंत्री निळकंठ हळर्णकर, श्री देवी नवदुर्गा प्रतिष्ठान ट्रस्टचे अध्यक्ष शैलेद्र पणजीकर उपस्थित होते. त्यानंतर उन्नत भारत अभियानाअंतर्गत आकसणवाडा मडकई येथील गोवा विद्यापीठाने दत्तक घेतलेल्या शिंपल्याच्या लागवडी सागर शेती स्थळाला भेट दिले. मडकई, वाडी तळावली, बांदोडा व कुंडई पंचायत सदस्यांच्या गाठीभेटी घेतल्या व समस्या जाणून घेतल्या. यावेळी सरपंच लक्ष्मी तारी वळवईकर, विश्वास फडते, दिलेश गावकर, सलोनी गावडे उपस्थित होते.
सायंकाळच्या सत्रात शिरोडा मतदारसंघातील बोरी, बेतोडा निरंकाल, पंचवाडी व शिरोडा पंचायतीच्या सदस्यांच्या भेटी घेतल्या. तत्पुर्वी शिरोडा येथील कामाक्षी देवीची दर्शन घेत आशिर्वाद घेतले. यावेळी जलस्रोत मंत्री सुभाष शिरोडकर तसेच बेतोडय़ाचे सरपंच विशांत गावकर, शिरोडा सरपंच अमित शिरोडकर, बोरी सरपंच ज्योती नाईक, पंचवाडी सरपंच अमिर नाईक, जिल्हा पंचायत सदस्य नारायण कामत व दिपक नाईक बोरकर उपस्थित होते.
राज्यपालांनी गोवा संपुर्ण यात्रेच्या पहिल्या टप्प्यात फोंडा व काणकोण तालूक्यातील सर्व पंचायतीना भेटी दिलेल्या आहेत. तेथील सरपंच व पंचसदस्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. ही सर्व माहिती संकलन केल्यानंतर ग्रामिण भागात वसणारा गोवा संबंधी पुस्तकरूपात प्रकाशन करण्यात येणार असल्याचे ते म्हणाले.









