पिरनवाडी नगरपंचायतीचा हलगर्जीपणा नडला
प्रतिनिधी / बेळगाव
पिरनवाडी नगरपंचायतीच्या हलगर्जीपणामुळे पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांची भटकंती सुरू आहे. पिरनवाडीतून शहरासाठी अनेक टँकर्स भरून पिण्याच्या पाण्याचा पुरवठा सुरू आहे. मात्र गावातील नागरिकांना घागरी घेवून गावभर फिरून पाणी गोळा करावे लागत आहे.
पिरनवाडी गावात एकूण 46 कूपनलिका आणि चार विहिरी आहेत. परंतु योग्य नियोजनाअभावी गावभर पाण्यासाठी भटकंती चालू आहे. गावच्या पूर्वेकडील मोठ्या विहिरीला मुबलक पाणी असूनही विद्युत मोटार वारंवार निकामी होत असल्याचे कारण सांगण्यात येते. पण संबंधित अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळेच नागरिकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे.
संपूर्ण गावाला पाणी पुरवठा करण्यासाठी दीड लाख लिटरचे तीन जलकुंभ आहेत. त्यांना पाणी पुरवठा करण्यासाठी दोन विहिरी आणि एक कूपनलिका आहे. परंतु तो पाणी पुरवठा मुबलक नाही, त्यासाठी प्रशासनाने त्या विहिरी स्वच्छ करून त्याची खोदाई करून पाण्याची पातळी वाढवण्यासाठी प्रयत्न करावे अशी मागणी नागरिकांतून करण्यात येत आहे.









