परूळे | प्रतिनिधी
कर्ली नदी पात्रात बेकायदेशीर वाळू उपसा करत असताना चिपी कालवंणवाडी येथील २५ ते ३० ग्रामस्थांनी शनिवारी रात्री होड्या पकडून महसूल आणि पोलिस विभागाच्या ताब्यात दिल्या. रेडी- रेवस सागरी महामार्गावरील वेंगुर्ले मालवण हे दोन तालुके जोडणाऱ्या चिपी देवली पुलाखाली जुवा बेटाच्या बाजूला बेकायदेशीर वाळू उपसा होत असताना कालवंणवाडी येथील ग्रामस्थांनी एकत्र जाऊन या होड्या अडविल्या. यादरम्यान दोन होड्या अडवून संबंधित यंत्रणेच्या ताब्यात देण्यात यश आले तर एक होडी पळवून नेण्यात आली . वेंगुर्ले तालुक्यातील चिपी कालवंडवाडी कर्ली खाडीमध्ये कालवंणवाडीतील शेतकऱ्यांचे जुवा बेट आहे. बेटाच्या चारही बाजूला पाणी आहे. आणि सदर जुवा बेट सातबारावर नोंद आहे. जुवा बेटाला लागून कर्ली खाडीवरील सागरी महामार्ग जोडणारे चिपी देवली पूल आहे. याच बेटाला लागून मालवण तालुक्यातील देवली गावातील वाळू माफिया रात्रंदिवस वाळू काढत असतात. शासन दरबारी तक्रारी केल्या तरी शासन काहीही दखल घेत नसल्याने अखेर कालवंडवाडी ग्रामस्थांनी रात्री १२ वाजता नदीपात्रात जाऊन सर्व बोटी पकडून परुळे तलाठी यांना बोलाविले. परुळे तलाठी यांनी निवती पोलिसांना घेऊन कारवाई केली. यावेळी ७ परप्रांतीय कामगारांना ताब्यात घेऊन गुन्हे दाखल केले आहेत . निवती पोलीस ठाण्याचे श्री.बी. डीसोजा, महेश कदम, श्री लोणे,मारुती कांदळगावकर , महसूल अधिकारी रजनीकांत नायकाडे, परूळे ,गौतम सुतार -पाल तलाठी, श्री मोरे तलाठी उभादंडा रकमानंद वरक कोतवाल परूळे, संदेश पवार ,पोलीस.पाटील-चिपी- परुळे यांनी तहसीलदार श्री ओतारी व निवती पोलीस ठाण्याचे श्री.गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई केली. कारवाईदरम्यान ७ परप्रांतीय संशयितांना अटक करण्यात आली. मिळालेल्या माहितीनुसार प्रत्येक बोटीमध्ये तीन ब्रास प्रमाणे सहा ब्रास वाळू होती सदर बोटी तारकर्ली काळेथर येथील समीर वाककर ,अजित वाककर ,आणि देवली येथील अजित चव्हाण यांच्या मालकीची असल्याची माहिती अटक करण्यात आलेल्या कामगारांकडून पोलिसांना देण्यात आली.









