पारपोली गुरववाडी येथील घटना
ओटवणे प्रतिनिधी
पारपोली गुरववाडी येथे विहिरीत पडलेल्या घारीला बुधवारी सायंकाळी उशिरा विहिरीतून वर काढत स्थानिक ग्रामस्थानी त्या घारीला जीवदान दिले. सुमारे अडीच फूट लांबीची व दीड फूट उंचीची ही घार गुरववाडी येथील सामाजिक कार्यकर्ते विश्वास नाईक यांच्या घरालगतच्या विहिरीत पडली होती. बुधवारी सायंकाळी उशिरा पारपोली सरपंच कृष्णा नाईक यांच्या पत्नी शुद्धमती नाईक या काजू बागेतून घरी येत असताना त्यांना विहिरीत फडफडण्याचा आवाज आला. याची माहिती त्यांनी आपले पती श्री नाईक यांना दिली. त्यानंतर विहिरीत बॅटरीचा प्रकाश मारून पाहिले असता घार पडल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर विश्वास नाईक यांनी सरपंच कृष्णा नाईक यांच्यासह मुलगा विश्वास व दुर्गेश नाईक यांच्या सहाय्याने विहिरीत पडलेल्या या घारीला प्रथम बालदीच्या सहाय्याने वर काढण्याचा प्रयत्न केला. मात्र तो अयशस्वी ठरला. त्यानंतर विहिरीत जाळे सोडून या घारीला अथक प्रयत्नानंतर वर काढण्यात आले. त्यानंतर या घारीला पाहण्यासाठी सगळ्यांची एकच गर्दी झाली. दरम्यान विहिरीत पडलेल्या या घारीला किरकोळ दुखापत झाली. मात्र विहिरीतून वर काढल्यानंतर ही घार स्वतः चालत होती. त्यानंतर विश्वास नाईक यांनी या घारीला नैसर्गिक अधिवासात सोडले.









