आजपासून मुतगे येथे यात्रेला प्रारंभ : उद्या मुख्य दिवस : लाभ घेण्याचे भाविकांना आवाहन : भाविकांच्या वाहनांचे शाळा आवारात पार्किंग
वार्ताहर/सांबरा
मुतगे येथील ग्रामदेवता व जागृत देवस्थान म्हणून प्रसिद्ध असलेल्या श्री भावकेश्वरी देवीच्या यात्रेसाठी ग्रामस्थ सज्ज झाले आहेत. दोन दिवस चालणाऱ्या या यात्रेची देवस्थान कमिटी, ग्रामपंचायत, ग्राम सुधारणा मंडळ व ग्रामस्थांनी जय्यत तयारी केली आहे.
मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई
यात्रेनिमित्त मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. मंदिर परिसराची स्वच्छता करण्यात आली आहे. देवस्थान कमिटीने महिला व पुरुषांना देवीचे व्यवस्थित दर्शन घेता यावे यासाठी तयारी केली आहे. भाविकांच्या स्वागतासाठी वेशीमध्ये भव्य स्वागत कमान उभारण्यात आली आहे.
पार्किंगची सोय
मंदिराकडे जाणाऱ्या भाविकांची गैरसोय होऊ नये म्हणून दुचाकी व चार चाकी वाहनांसाठी पार्किंगची सोय मेनरोडनजीक करण्यात आली आहे. न्यू इंग्लिश स्कूलचे मैदान व सरकारी मराठी प्राथमिक शाळेच्या मैदानावरच भाविकांनी आपल्या दुचाकी व चार चाकी वाहने पार्क करून मंदिराकडे यावे, असे आवाहन करण्यात आले आहे. शुक्रवार व शनिवार असे दोन दिवस गावात दुचाकी व चार चाकी वाहनांना प्रवेशबंदी असणार आहे. यात्रेदरम्यान भाविकांची गैरसोय होऊ नये यासाठी पोलीस प्रशासनानेही योग्य ती खबरदारी घेतली असून, पार्किंग व रहदारीसंबंधी काही सूचना केल्या आहेत. मुलांच्या मनोरंजनासाठी पाळणे खेळण्याची व इतर दुकाने थाटण्यात आली आहेत.
आज ओटी भरणे कार्यक्रम,उद्या यात्रेचा मुख्य दिवस
शुक्रवार दि. 18 रोजी सकाळी मंदिरात हक्कदारांच्या हस्ते देवीची ओटी भरण्यात येणार आहे. त्यानंतर दिवसभरात ओटी भरणे, नवस फेडणे आदी धार्मिक कार्यक्रम होणार आहेत. रात्री बारानंतर गाऱ्हाणे घालण्याचा कार्यक्रम होणार आहे. शनिवार दि. 19 रोजी यात्रेचा भर दिवस राहणार आहे. यात्रेदरम्यान राज्य परिवहन मंडळाने जादाच्या बसफेऱ्या सोडाव्यात, अशी मागणी करण्यात येत आहे. भाविकांनी यात्रेचा लाभ घ्यावा, असे कमिटीतर्फे कळविण्यात आले आहे.









