मुतगे येथे तब्बल चार वर्षांनंतर ग्रामसभा : ग्रामस्थांकडून प्रश्नांचा भडिमार : समाधानकारक उत्तरे न मिळाल्याने नाराजी
वार्ताहर/सांबरा
मुतगे येथे तब्बल चार वर्षांनंतर झालेल्या ग्रामसभेमध्ये पीडीओसह ग्राम पंचायत अध्यक्षांवर ग्रामस्थांनी प्रश्नांचा भडिमार केला. मात्र एकाही प्रश्नाचे ग्रामस्थांना समाधानकारक उत्तर न मिळाल्याने नाराजी व्यक्त करण्यात आली. मागील चार वर्षांपासून येथे ग्रामसभा घेण्यात आलेली नाही. त्यामुळे मागील महिन्यामध्ये झालेल्या मासिक बैठकीत ग्रामस्थांनी ग्रामसभा घेण्याची मागणी केली होती. त्यानुसार 20 मार्चला कोणत्याही परिस्थितीत ग्रामसभा घेण्यात येईल, असे ग्रामपंचायतीकडून ग्रामस्थांना लेखी आश्वासन देण्यात आले होते. त्यानुसार गुऊवार दि. 20 रोजी ग्रामपंचायत कार्यालयात ग्रामसभा झाली. ग्रामसभेला 19 पैकी 17 सदस्य उपस्थित होते.
ग्रामसभेमध्ये मागील कार्यकाळात झालेल्या काही कामांबद्दल कागदपत्रानिशी जाब विचारला. मात्र ग्रामसभेचे नोडल अधिकारी असलेले पीडीओ बसवंत कडेमणी यांना समर्पक उत्तर देता आले नाही. ता.पं. सहाय्यक संचालक व पीडिओ असलेल्या बसवंत कडेमनी यांना नोडल अधिकारी म्हणून नेमण्यात आले होते. ग्रामसभेत ग्रामस्थांनी प्रश्नांचा भडिमार उपस्थित केला. पूर्व भागातील एका कंत्राटदाराच्या नावे सहा लाखाहून अधिक रकमेचे बिल काढण्यात आले आहे. तसेच स्ट्रीट लाईट खरेदी करण्यासाठी एकाच महिन्यात तीन-चार वेळा बिले काढण्यात आली आहेत.
याबाबतचा ग्रामस्थांनी पुरावा सादर करत याचा खुलासा करण्याची मागणी केली. मात्र याचे समर्पक उत्तर न मिळाल्याने ग्रामपंचायतीत भ्रष्टाचार झाल्याचा सूर ग्रामस्थांतून ऐकावयास मिळत आहे. तसेच जि. पं.च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ग्रामसभा घेऊन कामांची चौकशी करावी, अशी मागणी ग्रामस्थांतून होत आहे. ग्रामसभेला ग्रा. पं. माजी अध्यक्ष उमेश पुरी, माजी सैनिक सातेरी पाटील, सयाजी पाटील, आप्पाणा बस्तवाड, आप्पाणा चौगुले, शरद पाटील, सागर पाटील, सुरज पाटील, भरतेश चौगुले, भरत पाटील, विनायक केदार, राजेंद्र पाटीलसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.









