जीवदायिनीवर घाला घालण्याचा प्रयत्न हाणून पाडण्याचा ग्रामसभेत ठराव : गरज पडल्यास उपोषण करणार
प्रतिनिधी /वाळपई
बेळगाव येथे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हदई नदीचे पाणी वळविण्या संदर्भात केलेल्या वक्त्यावरवरून आज केरी सत्तरी पंचायतीच्या ग्रामसभेत संतप्त प्रतक्रिया उमटल्या. यावेळी कर्नाटक सरकारविरोधात घोषणाबाजी करून कर्नाटक सरकारचा निषेध करण्यात आला. कर्नाटक सरकारने नदीचे पाणी वळविण्याचा प्रयत्न केल्यास उपोषण करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला आहे. सरकारने याबाबत गांभीर्याने विचार करून कायदेशीर लढाई हाती घेतल्यास केरी पंचायत सरकारच्या मागे खंबीरपणे उभे राहणार, असा ठराव यावेळी घेण्यात आला. सरपंच दीक्षा गावस यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामसभा घेण्यात आली. यावेळी पंचायतीचे उपसरपंच भिवा गावस, पंच नंदिता गावस, संदीप ताटे, श्रीपाद गावस, राजेश गावस, तन्वीर पागंम, उस्मान सय्यद, सुप्रिया गावस आदुसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सर्वप्रथम केरी पंचायत क्षेत्राला फटका बसणार!
म्हादई नदीवर धरण झाल्यास केरी पंचायत क्षेत्राला सर्वप्रथम मोठा फटका बसणार आहे. यामुळे सदर धरण प्रकल्पाला तीव्र विरोध करावा, अशी मागणी यावेळी विष्णू पारोडकर व सीताराम गावस यांनी केली. कृष्णा माजिक म्हादई प्रश्नीत सर्वांनी राजकीय मतभेद बाजूला सारून एकजूट दाखवावी व कर्नाटक सरकारच्या विरोधात सरकार घेतलेल्या निर्णयाला पाठिंबा द्यावा असे आवाहन केले. म्हादई नदीचे अभ्यासक दशरथ मोरजकर यांनी हा विषय अत्यंत गंभीर असल्याचे स्पष्ट केले. कर्नाटक सरकारचा डाव हाणून पडला पाहिजे, असे मत व्यक्त केले. गरज पडल्यास म्हादईसाठी आम्ही उपोषण करू, असा इशारा यावेळी सूर्यकांत गावस यांनी केले.
पंचायतीने भूमिका स्पष्ट करण्याची मागणी
म्हादई नदीच्या विषयावर चर्चा सुरू असताना सरपंच, पंचांनी मौनव्रत धारण केले. त्यामुळे ग्रामस्थ आक्रमक झाले. म्हादईच्या विषयावर एवढी गरमागरम चर्चा होत असताना पंचायत कोणती भूमिका घेणार? असा संतप्त सवाल यावेळी चंद्रशेखर गावस यांनी करत पंचायतीने भूमिका मांडावी अशी आग्रही मागणी केली. यावर सरपंच दीक्षा गावस यांनी पंचायत मंडळ ग्रामस्थांच्या तसेच राज्य सरकारच्या भूमिकेसोबत ठामपणे उभे राहणार, अशी ग्वाही दिली.
पंचायत अंतर्गत समिती गठित
म्हादई नदी प्रश्नी पुढील निर्णय घेण्यासाठी पंचायत अंतर्गत समिती नियुक्त करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली. त्या निर्णय घेऊन सरपंच दीक्षा गावस, उपसरपंच भीमा गावस यांच्या नेतृत्वाखाली समिती गठित केली. या समितीचे पदाधिकारी पुढील प्रमाणे : सरपंच दीक्षा गावस, उपसरपंच भिवा गावस, सीताराम गावस, कृष्णा माजिक, चंद्रशेखर गावस, विष्णू पारोडकर, नामदेव गावस, राजाराम म्हालकर, सूर्यकांत गावस, चंद्रकांत पिसुर्लेकर, आत्माराम गावस, दशरथ मोरजकर, अशोक गावस, मनीषा गावस, अनिता गावस. ही समिती म्हादई संवर्धनाबाबत विशेष लक्ष देणार असून गरज पडल्यास या संदर्भात कायदेशीर बाबी हाताळणार, असे यावेळी स्पष्ट करण्यात आले.
राजेंद्र केरकर, देविदास पांगम यांचे अभिनंदन
दरम्यान, म्हादई लढ्यासाठी सुऊवातीपासूनच विशेष योगदान देणारे केरीचे सुपुत्र पर्यावरणप्रेमी राजेंद्र केरकर व राज्याचे अॅडवोकेट जनरल देविदास पांगम यांच्या भूमिकेचे यावेळी अभिनंदन करण्यात आले. त्यांच्या म्हादई संदर्भात घेतलेल्या भूमिकेबाबत अभिनंदन करणारा ठराव या ग्रामसभेमध्ये मंजूर करण्याचा आला. म्हादई नदी संदर्भात विस्तृत माहिती देण्यासाठी राजेंद्र केरकर यांना ग्रामसभेत आमंत्रित करावे, अशी मागणी गजानन गावस यांनी केली. अशोक गावस नामदेव गावस, सूर्यकांत गावस यांनीही यावेळी या विषयावर विचार मांडले.









