चोरट्यांमध्ये एका महिलेचा समावेश ; आरोस येथील घटना
न्हावेली / वार्ताहर
सावंतवाडी तालुक्यातील आरोस -गावठण येथे पहाटे ३.३० वाजण्याच्या सुमारास दोन मोटरसायकल चोरांना चोरी करुन गाडी पळवून नेताना ग्रामस्थांनी रंगेहाथ पकडले.यात एका महिलेचाही समावेश आहे. हे दोघेही सावंतवाडी – सालईवाड्यातील असल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे .
आरोस येथे घडलेली घटना अशी की, गावातील योगेश सगुण देऊलकर व संदेश देऊलकर हे दोघे पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास गोवा येथे कामानिमित्त बाहेर जाण्यासाठी निघाले होते. देऊलकर यांची घरे रस्त्यापासून सखल भागात असल्याने तेथील लोकांच्या दुचाकी या रस्त्याच्या कडेला सुरक्षित जागी पार्किंग करतात .आज मंगळवार पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास योगेश देऊलकर कामाला जाण्यासाठी रस्त्यावर आला असता त्यांची गाडी कोणीतरी अज्ञात व्यक्तीने स्टार्ट करुन पळवून नेत असल्याचे त्याने पाहिले. तात्काळ त्याने आपला भाऊ संदेश यांच्या सोबतीने त्यांच्या ताब्यातील चारचाकी गाडीने चोरांचा पाठलाग केला. व गाडी चोरुन नेताना दोघांना काही अंतरावर रंगेहाथ पकडले. संशयित दोघेही त्यांच्या ताब्यातील एक्टिवा दुचाकीवरून आले असल्याचे सांगण्यात आले .त्यातील एक मोटरसायकल चोरी करुन पळवून नेत होता तर एक्टिवा दुचाकी त्याच्या सोबत असलेली महिला चालवीत असल्याचे आढळून आले. तर त्याठिकाणी पार्क केलेली दुसरी मोटरसायकल चोरीस गेली आहे . या चोरटयांनी व त्याच्या साथीदारांनी चोरी केली असावी असा संशय ग्रामस्थांनी व तक्रारदारांनी व्यक्त केला आहे . या घटनेची माहिती पोलिसांना दिल्यानंतर घटनास्थळी पोलिसांनी येऊन दोघा चोरट्यांना ग्रामस्थांनी पोलिसांच्या ताब्यात दिले . सावंतवाडी पोलीस ठाण्यात दुचाकी मालकाने दिलेल्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती .









