प्रतिनिधी/ बेळगाव
हलगा-मच्छे बायपासला तीव्र विरोध सुरू असतानाच तालुक्यावर आता पुन्हा एकदा रिंगरोडचे वादळ घोंघावू लागले आहे. रिंगरोडसाठी झाडशहापूर येथे सर्व्हे करण्यासाठी आलेल्या राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना शनिवार दि. 21 रोजी संतप्त ग्रामस्थांनी धारेवर धरत पिटाळून लावले. त्यामुळे रिंगरोडचा वाद चिघळण्याची शक्यता आहे.
रिंगरोडच्या नावाखाली तालुक्यातील पिकावू जमिनींचे संपादन करण्याचा डाव सुरू आहे. रिंगरोडला गेल्या अनेक वर्षांपासून शेतकरी, तसेच म. ए. समितीच्यावतीने जोरदार विरोध केला जात आहे. रिंगरोड करण्यात येऊ नये यासाठी रस्त्यावरच्या लढाईबरोबरच न्यायालयीन लढादेखील दिला जात आहे. हलगा-मच्छे बायपासला ज्याप्रमाणे शेतकऱ्यांचा विरोध सुरू आहे, त्याचप्रमाणे रिंगरोडलाही शेतकऱ्यांतून तीव्र विरोध सुरू आहे. रस्त्यासाठी पिकावू जमीन देणार नाही, अशी भूमिका शेतकऱ्यांनी घेतली आहे. पण जमिनीच्या मोबदल्यात आर्थिक नुकसानभरपाई देण्याचे सांगून काही शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे जमा केले जात आहेत. पण ज्या कुटुंबीयांचा उदरनिर्वाह केवळ शेतीवर आहे, ते शेतकरी जमीन देण्यास तीव्र विरोध करत आहेत. कोणत्याही परिस्थितीत पिकावू जमीन देणार नाही, असा निर्धार बहुतांश शेतकऱ्यांनी केला आहे.
झाडशहापूर येथील महामार्गापासून नियोजित रिंगरोड केला जाणार असल्याने तेथील शेतकऱ्यांनी न्यायालयात धाव घेऊन रस्ताकामाला यापूर्वीच स्थगिती मिळविली आहे. स्थगिती असतानाही शनिवारी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी व कर्मचारी झाडशहापूर ते वाघवडे दरम्यानच्या मुंगेत्री नाल्यापर्यंत सर्व्हे करून हद्द निश्चित करत आहेत, अशी माहिती ग्रामस्थांना समजताच संतप्त ग्रामस्थांनी त्याठिकाणी धाव घेतली. सर्वेक्षण करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना धारेवर धरत सर्व्हे काम हाणून पाडले. न्यायालयाचा मनाई आदेश असताना सर्वेक्षण का केले जात आहे? अशी विचारणा करत जमिनीत रोवण्यात आलेले पोल काढण्यास भाग पाडले. तसेच न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पोलिसात तक्रार दाखल करण्याची तयारी ग्रामस्थांनी केली होती. मात्र पोलिसांनी मध्यस्थी केल्याने सर्व्हेसाठी आलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी गावातून काढतापाय घेतला. झाडशहापूर येथील ग्रामस्थ आक्रमक बनले असून तालुक्यातील विविध गावांमध्ये अशा पद्धतीने विरोध होणे गरजेचे आहे.









