नगरगावात तीव्र संताप : बंच केबलमध्ये होणाऱ्या वारंवार बिघाडामुळे कोदाळ, साटरे,नानोडा, उस्ते भागात वीजपुरवठा खंडित : त्वरित दुरुस्त करण्याची मागणी
वाळपई : पावसाळा अद्याप सुरू झाला नाही. तरीही वारंवारपणे विजेच्या केबलमध्ये वारंवारपणे बिघाड होऊन नगरगावातील नानोडा, बांबर ,धावे ,उस्ते, कोदाळ, साटरे, देरोडे भागात खंडित वीजपुरवठ्याची समस्या वाढली आहे. हा प्रकार नेहमीच घडत असल्यामुळे संतप्त नागरिकांनी मंगळवारी संध्याकाळी वाळपई वीज उपकेंद्रावर धडक देऊन जाब विचारला. पाऊस नसतानाही एवढी समस्या तर पावसाळ्यात काय स्थिती असेल?, असा सवाल करून त्यांनी अधिक्रायांना धारेवर धरले. दोन वर्षांपूर्वी जंगलातील झाडामुळे वीज वाहिन्यांना व्यत्यय येत असल्यामुळे बंच केबलची सुविधा उपलब्ध करण्यात आली. मात्र सदर केबल घालण्यात आल्यानंतर वारंवारपणे वीजपुरवठा खंडित होत असतो. उपलब्ध माहितीनुसार आंब्याचे मळ या ठिकाणी सदर केबलमध्ये अनेक वेळा बिघाड होतो. यामुळे वरील भागातील विविध पुरवठा सातत्याने खंडित होत असतो. गेल्या दोन वर्षांपासून ही परिस्थिती कायम आहे. मंगळवारी दुपारी वीज पुरवठा खंडित झाला. रात्री उशिरापर्यंत वीजपुरवठा पूर्वपदावर न आल्यामुळे संतप्त ग्रामस्थांनी वाळपईच्या वीज कार्यालयाच्या उपकेंद्रावर धडक देऊन या संदर्भात आपला तीव्र संताप व्यक्त केला. त्यानंतर सदर केबलमध्ये दोष असल्याचे आढळून आले. याची कायमस्वरूपी दुऊस्ती होणे गरजेचे होते. मात्र त्याकडे दुर्लक्ष करण्यात आल्यामुळे नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त करून पावसाळ्यापूर्वी ही समस्या निकालात काढा. अन्यथा त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील, असा इशारा यावेळी देण्यात आला. आंब्याचे मळ व नगरगाव विविध कार्यकारी सेवा सोसायटी या इमारतीच्या जवळ असलेल्या बंच केबलमध्ये सातत्याने दोष आढळून येत असतो. यामुळे अनेक वेळा वरील सर्व गावातील वीज पुरवठा खंडित होत असतो. गेल्या वर्षी यामध्ये कायमस्वरूपी दुऊस्ती करण्याची मागणी केली होती. मात्र याकडे अद्याप लक्ष देण्यात आलेले नाही. यामुळे यंदाही पावसाळ्यात तीच स्थिती निर्माण होण्याची भीती नागरिकांनी व्यक्त केलेली आहे.
मध्यरात्री अडीच वाजता वीजपुरवठा पूर्वपदावर
दरम्यान, रात्री अडीच वाजता वीजपुरवठा पूर्व पदावर आला. ज्या ठिकाणी आवश्यक दुऊस्ती होती ती करण्यात आल्यानंतर वीजपुरवठा पूर्वपदावर आल्याची माहिती साहाय्यक अभियंता दीपक गावस यांनी याबाबत बोलताना दिली.
केबल्स दुरुस्ती प्रक्रिया आजपासून
साहाय्यक अभियंता दीपक गावस यांनी सांगितले की सदर भागांमध्ये एकूण 39 किलोमीटरचा बंच केबल घालण्यात आलेला आहे. अनेक ठिकाणी जोडण्या करण्यात आलेले आहे. ते आता कमकुवत झालेले आहेत. कॉन्टॅक्टर एजन्सीचा करार संपुष्टात आलेला आहे. यामुळे खातेतर्गत कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देऊन ज्या ठिकाणी वारंवार वीज खंडित होते. त्या ठिकाणी नव्याने जोडणी करण्याचे काम हाती घेतले आहे. मात्र नगरगाव पंचायत क्षेत्रातील 39 किलोमीटर अंतरावर सुमारे 40 पेक्षा जास्त ज्या जोडण्या कमकुवत झालेल्या आहेत. त्या नव्याने हाती घेण्यात येणार आहे. याची सुऊवात गुऊवारपासून करण्यात येणार असल्याचे ग्रामस्थांनी यावेळी स्पष्ट केले.
भूमिगत वीजवाहिन्यांचा प्रस्ताव मंजुरीच्या प्रतीक्षेत
या भागामध्ये बंच केबल घालण्यात आल्यानंतर ज्या तक्रारी वाढू लागलेल्या आहेत. त्याचा सारासार विचार करून भूमिगत केबल घालण्याची प्रक्रिया पुढे नेण्यात येणार आहे. या संदर्भाचे दोन प्रस्ताव तयार करण्यात आलेली आहे, अशी माहिती सहाय्यक अभियंता दीपक गावस यांनी दिली. या दोन्ही प्रस्तावाना मंजुरी मिळाल्यानंतर पुढील पावसामध्ये या भागामध्ये अडचणी निर्माण होणार नाहीत याची खात्री आपण देतो, असे गावस यांनी यावेळी सांगितले. या प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यानंतर लवकरच भूमिगत केबल्स घालून ज्या नागरिकांच्या समस्या आहेत त्या दूर करण्याचा निश्चितच प्रयत्न केला जाईल, असे यावेळी त्यांनी सांगितले.









