एम . बी . बी. एस डॉक्टर साठी पं.स माजी सदस्य बाळ शिरसाट व ग्रामस्थांनी पुकारले होते उपोषण
सावंतवाडी : प्रतिनिधी
मळेवाड प्रा.आरोग्य केंद्रात एम् बी बी एस डॉक्टर नसल्याने दशक्रोशित मोठी गंभीर समस्या निर्माण झाली होती. त्यामुळे मळेवाड येथील माजी पंचायत समिती सदस्य बाळ शिरसाट व मळेवाड कोंडूरे येथील ग्रामस्थांनी एम बी बी एस डॉक्टर नियुक्तीसाठी व अन्य समस्यांबाबत दिनांक २२ मे २०२३ रोजी मळेवाड येथे उपोषण केले होते. मात्र या दरम्यान जिल्हा आरोग्य अधिकारी उपोषण स्थळी दाखल होत डॉक्टर देण्याबाबत आश्वासन दिल्याने उपोषण तात्पूर्तेस्वरूपात मागे घेण्यात आले होते.मात्र डॉक्टर नियुक्त न झाल्याने परत एकदा सीताराम ( बाळ) शिरसाट व ग्रामस्थांनी १५ ऑगस्ट रोजी उपोषण छेडण्या बाबत निवेदन दिले होते.
या निवेदनाची तात्काळ दखल घेत मळेवाड आरोग्य केंद्रासाठी एम बी बी एस डॉक्टर नियुक्तीचे लेखी स्वरूपात पत्र जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी बाळ शिरसाट व ग्रामस्थांना यांना दिल्याने १५ ऑगस्ट रोजी पुकारलेले आमरण उपोषण स्थगित करण्यात आले होते.
मात्र सध्यस्थितीत डॉक्टर आरोग्य केंद्रात उपलब्ध झाले नसल्याने परत एकदा बाळ शिरसाट व ग्रामस्थांनी शुक्रवार दिनांक १ सप्टेंबर २०२३ रोजी मळेवाड आरोग्य केंद्रात ठिय्या मांडला आणि जोपर्यंत एम बी बी एस डॉक्टर ची नियुक्त होऊन हजर होत नाही तोपर्यंत आपण येथून हलणार नाही असा इशारा दिला. यावेळी येथील ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.









