जिल्हाध्यक्ष महादेवाप्पा इंगळगी यांची पत्रकार परिषदेत माहिती
बेळगाव : कर्नाटक सरकारच्या महसूल विभागात मागील 44 वर्षांपासून ग्राम सहाय्यक म्हणून कार्यरत असलेल्या डी दर्जाच्या कर्मचाऱ्यांकडे दुर्लक्ष झाले आहे. शासनाच्या विविध योजनांपासून वंचित रहावे लागत आहे. यासाठी कित्तूर येथून विधानसौधकडे पदयात्रा काढली जाणार आहे, अशी माहिती कर्नाटक राज्य महसुल खाते ग्राम सहाय्यक संघ बेळगाव जिल्हाध्यक्ष महादेवाप्पा इंगळगी यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. मंगळवार दि. 12 रोजी सकाळी 8 वाजता या पदयात्रेला सुरुवात होणार आहे. डी दर्जा ग्रुपमधील कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी सुवर्णसौधला घेराव घातला जाणार आहे. महसूल विभागात मागील कित्येक वर्षांपासून कर्मचारी कार्यरत आहेत. मात्र या कर्मचाऱ्यांना सेवा सुरक्षाअभावी वंचित रहावे लागत आहे. विविध खात्यामध्येही डी दर्जा ग्रुपमधील कर्मचारी कार्यरत आहेत. मात्र यांना शासनाच्या कोणत्याच सुविधा मिळेनाशा झाल्या आहेत. तुटपुंज्या वेतनावर काम करावे लागत आहे. नोकरीत कायम करून सुविधा पुरवाव्यात, अशी मागणीही यावेळी करण्यात आली आहे. शिवाय विविध मागण्यांसाठी 12 रोजी कित्तूर येथून पदयात्रा काढली जाणार आहे. यामध्ये विविध संघटना सामील होणार आहेत, अशी माहितीही इंगळगी यांनी दिली.









