देवरुख :
शहरातील विश्वविक्रमी रांगोळी कलाकार विलास विजय रहाटे याने आषाढी एकादशीनिमित्त अनोख्या पद्धतीने पाण्याखाली विठुरायाची रांगोळी साकारून भक्तगणांना प्रत्यक्ष विठुरायाचे दर्शन दिले आहे. विलासच्या कलेचे सर्वत्र कौतुक होत आहे.
आषाढ महिना हा निःस्सीम विठ्ठलभक्त अर्थात वारकऱ्यांसाठी आनंदाचे पर्व असते. आषाढ महिन्यात पायी वारी, दिंडी आणि विठूनामाचा गजर सर्व महाराष्ट्रभर सुरू असतो. या विठ्ठलमय वातावरणात सात्विकता येते ती विठुरायाच्या अभंग, भजन आणि कीर्तनाने. प्रत्येक व्यक्तीची भक्ती आणि श्रद्धा वेगवेगळ्या प्रकारच्या असतात. त्यातून त्या व्यक्तीला व अख्ख्या समाजाला समाधान मिळते.
देवरुखचा विश्वविक्रमी रांगोळी कलाकार विलास रहाटे याने रांगोळीच्या माध्यमातून विठुरायाचरणी सेवा अर्पण केली आहे. पाण्याखाली विठुरायाची रांगोळी साकारून प्रेक्षकांना प्रत्यक्ष विठुरायाचे दर्शन दिले आहे. जुनी पितळेची परात, त्यामध्ये विविध रांगोळीचे रंग आणि देवरुखवासियांचे श्रद्धास्थान असणाऱ्या सप्तलिंगी नदीचे पाणी वापरून ही अनोखी व कठीण रांगोळी केवळ १ तासाच्या कालावधीत पूर्ण केली. पाण्याखालील रांगोळी साकारण्यासाठी कलेचा कस लागतो व तशी कठीण रांगोळी केवळ एका तासात पूर्णत्वाला नेणे फारच कौशल्याचे काम असते. परंतु कसबी कलाकार विलासने कठीण रांगोळी पूर्णत्वाला नेऊन प्रेक्षकांची वाहवा मिळवली आहे.








