जमीन घोटाळा तब्बल एक हजार कोटींचा : विक्रांतचा 60 ते 70 जमीन विक्रीत सहभाग
प्रतिनिधी /पणजी
राज्यातील जमीन घोटाळ्य़ांची चौकशी करण्यासाठी स्थापन केलेल्या विशेष तपासणी पथकाने (एसआयटी) केलेल्या पहिल्याच धडक कारवाईमुळे आसगाव बार्देश येथील एका जमीन घोटाळ्य़ाप्रकरणी मोठा उलगडा होत असून मडगाव येथील विक्रांत शेट्टी याला तातडीने अटक केली आहे. प्राप्त अंदाजानुसार हा महाघोटाळा असून तो साधारणतः 1 हजार कोटी रुपयांचा असण्याची शक्यता आहे.
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी गेल्याच आठवडय़ात राज्यातील जमीन घोटाळ्य़ांची सखोल चौकशी करण्यासाठी एसआयटीची स्थापना केली आणि सरकारकडे आलेल्या एका तक्रारीमध्ये बरेच तथ्य आढळल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी त्यात लक्ष घातले आणि या प्रकरणाची तातडीने चौकशी करण्याचा आदेश एसआयटीला दिला.
विक्रांत शेट्टीच्या मुसक्या आवळल्या
एसआयटीने या प्रकरणाची बरीच माहिती गोळा केली असता पुढील चौकशीसाठी विक्रांत शेट्टी याला मडगाव येथे जाऊन शिताफीने अटक केली. जमिनीचा मालक एकटा आणि भलत्यालाच त्या विकायच्या आणि त्यातून बराच मोठा मलिदा तयार करायचा, असे कारस्थान गेले काही दिवस चालू होते. त्यात विक्रांत शेट्टी हा देखील अडकल्याचे पुरावे एसआयटीच्या हाती लागले आहेत.
विक्रांत शेट्टीने परस्पर विकले 70 भूखंड
या संदर्भात अद्याप सविस्तर कोणतीही माहिती पोलीस यंत्रणेने दिलेली नाही मात्र विक्रांतने जमीन घोटाळय़ांच्या 60 ते 70 प्रकरणांमध्ये सहभाग घेतल्याचे प्रथमदर्शनी पुरावे एसआयटीच्या हाती लागले आहेत. बहुतांश प्रकरणेही उत्तर गोव्यातील आहेत. दक्षिण गोव्यातीलही काही प्रकरणांचा आता उलगडा पुढील चार दिवसात होणार आहे. हा जमीन घोटाळा किमान रु. 1 हजार कोटींचा असण्याची शक्यता आहे.
अनेक अधिकारीही येणाऱया गोत्यात
या प्रकरणाच्या तपासाची चक्रे आता जलदगतीने फिरत असून या प्रकरणात मामलेदार, उपजिल्हाधिकारी, काही माजी सरपंच एवढेच नव्हे तर नगरनियोजन खात्यातील काही अधिकारी देखील यात अडकल्याची शक्यता आहे. एसआयटीचे पथक या दिशेने तपासाची चक्रे फिरवित असून काही अधिकारी निश्चितच गोत्यात येणार आणि या प्रकरणाचा आणखी एक मोठा उलगडा होण्याची शक्यता आहे. कोणी राजकीय व्यक्तीदेखील याच्या संपर्कात आलेली आहे का? या दृष्टीने देखील तपासणी सुरु आहे. पुढील दोन-चार दिवसात बराच मोठा गौप्मयस्फोट होण्याची शक्यता आहे.
कोणाचीही गय केली जाणार नाही : मुख्यमंत्री
ज्यांनी एसआयटी स्थापन केली त्या मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी यावर जास्त भाष्य करण्यास नकार दिला. या प्रकरणाची चौकशी होऊ द्या, आपण एसआयटीकडून अहवाल मागवतो, मगच त्यावर भाष्य करु शकतो असे ते म्हणाले. परंतु, जर कोणी अधिकारी त्यात अडकले असतील तर कोणाचीच गय केली जाणार नाही, सर्वांवर कडक कारवाई करणार,असा सजड इशारा मुख्यमंत्र्यांनी दिला.









