शिमल्यातून काँग्रेसकडून विनोद सुलतानपुरींना तिकीट
वृत्तसंस्था/ शिमला
काँग्रेसने हिमाचल प्रदेशातील दोन जागांसाठी उमेदवार जाहीर केले आहेत. पक्षाने मंडी लोकसभा मतदारसंघातून आमदार आणि राज्य सरकारचे मंत्री विक्रमादित्य यांना तिकीट दिले आहे, तर शिमला लोकसभा मतदारसंघातून विनोद सुलतानपुरी यांना उमेदवारी दिली आहे. चित्रपट अभिनेत्री कंगना राणौत भाजपच्या तिकीटावर मंडी लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहे. कंगनाला आव्हान देण्यासाठी काँग्रेसने विक्रमादित्य सिंग यांना उमेदवारी दिली आहे.
मंडी लोकसभा जागेवर ‘राणी’ आणि ‘राजा’ यांच्यात लढत रंगणार आहे. ‘क्वीन’ या चित्रपटातून प्रसिद्ध झालेली कंगना राणौत भाजपच्या तिकीटावर लढत आहे तर राजघराण्याचा वंशज विक्रमादित्य सिंग तिला आव्हान देत आहे. ही जागा राजघराण्याची पारंपरिक समजली जाते. प्रतिभा सिंह स्वत: येथून तीनदा खासदार झाल्या आहेत. वीरभद्र सिंह 2009 मध्ये खासदार झाले. आता त्यांचा मुलगा विक्रमादित्य मैदानात आहे. मंडी जागेसाठी सातव्या टप्प्यात 1 जून रोजी मतदान होणार आहे.
शिमलामधील लढतही रंगतदार
सिमला लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसने विनोद सुलतानपुरी यांना तिकीट दिले आहे. त्यांचा सामना भाजपचे विद्यमान खासदार सुरेश कुमार कश्यप यांच्याशी होणार आहे. गेल्या 15 वर्षांपासून ही जागा सातत्याने भाजपकडे आहे. सुरेश कुमार कश्यप यांच्या आधी वीरेंद्र कश्यप दोनदा येथून खासदार म्हणून निवडून आले होते. मात्र, त्यापूर्वी ही जागा काँग्रेसकडे होती.









