गलवान संघर्षानंतर पार पाडली महत्त्वाची
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
अनुभवी मुत्सद्दी विक्रम मिसरी यांनी सोमवारी भारताचे नवे विदेश सचिव म्हणून पदभार स्वीकारला आहे. 1989 च्या तुकडीचे भारतीय विदेश सेवेचे अधिकारी असलेले मिसरी यांनी विनय क्वात्रा यांची जागा घेतली आहे. 7 नोव्हेंबर 1964 रोजी श्रीनगरमध्ये जन्मलेले मिसरी हे चीनविषयक तज्ञ म्हणून ओळखले जातात. चीन आणि भारत संबंधांमध्ये तणाव असताना मिसरी हे देशाचे नवे विदेश सचिव झाले आहेत.
विक्रम मिसरी यांनी आज (सोमवार) विदेश सचिवचा पदभार स्वीकारला आहे. विदेश मंत्रालयाच्या टीमने विदेश सचिव मिसरी यांचे जोरदार स्वागत केले असून त्यांच्या यशस्वी कार्यकाळाची आम्ही कामना करतो असे विदेश मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जायसवाल यांनी म्हटले आहे.
मिसरी हे यापूर्वी उपराष्ट्रीय सुरक्षा सल्लागार म्हणून कार्यरत होते. इंद्रकुमार गुजराल, मनमोहन सिंह आणि नरेंद्र मोदी या तीन पंतप्रधानांचे खासगी सचिव म्हणून काम करण्याचा दुर्लभ मान त्यांना प्राप्त आहे. डेप्युटी एनएसएच्या स्वरुपात नियुक्त होण्यापूर्वी मिसरी हे 2019-21 पर्यंत चीनमध्ये भारताचे राजदूत म्हणून कार्यरत होते.
जून 2020 मध्ये गलवान खोऱ्यात झालेल्या हिंसक झटापटीमुळे भारत आणि चीन यांच्यात तणाव वाढल्यावर मिसरी यांनी चर्चेत महत्त्वाची भूमिका बजावली होती. गलवान खोऱ्यातील झटापटीनंतर दोन्ही देशांचे संबंध ताणले गेले होते. अशा स्थितीत काही प्रमाणात तणाव दूर करण्यास दोन्ही देशांना आता यश आले असून या प्रकरणी मिसरी यांनी महत्त्वाची भूमिका बजावली असल्याचे मानले जाते.
मिसरी यांनी स्वत:च्या कारकीर्दीत स्पेन (2014-16) आणि म्यानमार (2016-18) येथे भारताचे राजदूत म्हणून काम केले आहे. याचबरोबर पाकिस्तान, अमेरिका, जर्मनी, बेल्जियम आणि श्रीलंकेसह अनेक भारतीय दूतावासांमध्ये ते कार्यरत राहिले आहेत.
विनय क्वात्रा सेवानिवृत्त
विनय क्वात्रा हे विदेश सचिव म्हणून रविवारी सेवानिवृत्त झाले आहेत. विदेश मंत्री एस. जयशंकर यांनी क्वात्रा यांचे विदेश धोरण आणि राष्ट्रीय सुरक्षेच्या क्षेत्रातील समर्पण तसेच योगदानासाठी कौतुक केले आहे. क्वात्रा यांनी देशासाठी अनेक प्रमुख रणनीति तयार करणे आणि त्या अंमलात आणण्यास मदत केली असल्याचे जयशंकर म्हणाले. क्वात्रा यांची आता अमेरिकेतील भारताचे राजदूत म्हणून नियुक्ती होण्याची शक्यता आहे. तरनजीत संधू हे जानेवारीमध्ये सेवानिवृत्त झाल्यापासून हे पद रिक्त आहे.









