‘चांद्रयान-3’चे प्रोपल्शन मॉड्यूल झाले वेगळे : आता 23 ऑगस्टला सॉफ्ट लँडिंगची तयारी
वृत्तसंस्था /बेंगळूर, नवी दिल्ली
भारताच्या चांद्रयान-3 मोहिमेतील महत्त्वाचा टप्पा गुऊवारी पार पडला. पूर्वनियोजनानुसार, चांद्रयान-3 चे ‘विक्रम’ लँडर आणि प्रोपल्शन मॉड्यूल विभक्त झाले असून आता हे दोन्ही भाग चंद्राच्या कक्षेत स्वतंत्रपणे प्रवास करत आहेत. आता विक्रम लँडर आता प्रोपल्शन मॉड्यूलपासून विभक्त झाल्यानंतर 30 किमी × 100 किमीच्या लंबवर्तुळाकार कक्षेत फिरण्यासाठी डिऑर्बिटिंग करेल. चांद्रयान-3 मोहिमेतील ‘विक्रम’ लँडर आता चंद्राच्या जवळ पोहोचला असून त्याचे चंद्रावर सॉफ्ट लँडिंग करण्यासाठी इस्रोचे शास्त्रज्ञ सज्ज झाले आहेत. 23 ऑगस्ट रोजी सायंकाळी साडेपाच ते सहा वाजण्याच्या सुमारास ‘विक्रम’चे सॉफ्ट लँडिंग अपेक्षित आहे. गुऊवारी, 17 ऑगस्ट रोजी दुपारी सव्वाएक वाजता विक्रम लँडर चांद्रयान-3 च्या प्रोपल्शन मॉड्यूलमधून यशस्वीरित्या वेगळे करण्यात आले. आता लँडर मॉड्यूल चंद्राभोवती फिरत असताना टप्प्याटप्प्याने चंद्राच्या जवळ पोहोचणार आहे. लँडर मॉड्यूलमध्ये लँडर आणि रोव्हर असतात. या मिशनच्या 1.45 लाख किलोमीटरच्या प्रवासात आता फक्त 100 किलोमीटरचे अंतर विक्रम लँडरला पार करायचे आहे. आता लँडरला त्याचा वेग आणि उंची कमी करावी लागेल. चंद्राच्या कक्षेत जवळपास प्रदक्षिणा घालण्याची प्रक्रिया सुरू असतानाच त्याचा वेग कमी केला जाणार असल्याचे इस्रोने स्पष्ट केले आहे. लँडर मॉड्यूल भारतीय वेळेनुसार शुक्रवारी संध्याकाळी 4 वाजता डीबूस्टिंग करून चंद्राच्या किंचित खालच्या कक्षेत उतरणार आहे.
लँडरच्या वेगावर हळूहळू नियंत्रण
या मोहिमेची पुढची पायरी म्हणजे विक्रम लँडरला 30 किमी पेरील्यून आणि 100 किमी अपोलून कक्षेत डीऑर्बिटिंगद्वारे ठेवणे ही आहे. ही प्रक्रिया 18 आणि 20 ऑगस्ट रोजी करण्यात येणार आहे. पेरील्यून म्हणजे चंद्राच्या पृष्ठभागापासून कमी अंतर आणि अपोलून म्हणजे चंद्राच्या पृष्ठभागापासून जास्त अंतर. या मिशनमध्ये आतापर्यंतचा प्रवास प्रोपल्शन मॉड्यूलने केला असून आता ‘विक्रम’ लँडरलाच पुढील मार्गक्रमण करायचे आहे. लँडरने 30 किमी ×100 किमीची कक्षा प्राप्त केल्यानंतर सॉफ्ट लँडिंगचा टप्पा सुरू होईल. इस्रोसाठी हा सर्वात कठीण टप्पा असेल. 30 किमी अंतरावर विक्रमचा वेग कमी होईल आणि नंतर हळूहळू ‘विक्रम’ चंद्राच्या पृष्ठभागावर उतरेल. श्रीहरिकोटा येथून उ•ाण केल्यानंतर 14 जुलै रोजी चांद्रयान-3 तीन आठवड्यात अनेक टप्प्यांतून गेले. 5 ऑगस्ट रोजी अवकाशयानाने प्रथमच चंद्राच्या कक्षेत प्रवेश केला. यानंतर 6, 9 आणि 14 ऑगस्ट रोजी चांद्रयान-3 ने वेगवेगळ्या कक्षा बदल केला. आता शेवटचे पाच दिवस इस्रोसाठी निर्णायक आहेत.
14 दिवसांचा अध्ययन काळ
चांद्रयान-3 मिशनमध्ये लँडर, रोव्हर आणि प्रोपल्शन मॉड्यूलचा समावेश आहे. लँडर आणि रोव्हर चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरतील आणि 14 दिवस प्रयोग करतील. दुसरीकडे, प्रोपल्शन मॉड्यूल चंद्राच्या कक्षेत राहून चंद्राच्या पृष्ठभागावरून येणाऱ्या किरणांचा अभ्यास करेल. या मोहिमेद्वारे इस्रो चंद्राच्या पृष्ठभागावरील पाण्याचा शोध घेईल आणि चंद्राच्या पृष्ठभागावर भूकंप कसे होतात हेदेखील कळेल.
इस्रोचे ट्विट….
‘मित्रा, एकत्र प्रवास केल्याबद्दल धन्यवाद. लँडर मॉड्यूलला प्रोपल्शन मॉड्यूलपासून यशस्वीरित्या वेगळे केले गेले आहे. आता ते शुक्रवारी दुपारी 4 वाजता चंद्राच्या कक्षेत आणखी खाली आणले जाईल.’









